इम्रान खानच्या आधी हे क्रिकेटपटू बनले पंतप्रधान
पाकिस्तानला पहिलावहिला आणि एकमेव क्रिकेट वर्ल्ड कप जिंकवून देणारे इम्रान खान आता पाकिस्तानचे पंतप्रधान बनण्याची शक्यता आहे.
मुंबई : पाकिस्तानला पहिलावहिला आणि एकमेव क्रिकेट वर्ल्ड कप जिंकवून देणारे इम्रान खान आता पाकिस्तानचे पंतप्रधान बनण्याची शक्यता आहे. पाकिस्तानच्या निवडणुकांमध्ये इम्रान खान यांच्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. पण क्रिकेटपटू पंतप्रधान किंवा राष्ट्रपती झाल्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही काही क्रिकेटपटू त्यांच्या देशाचे पंतप्रधान किंवा राष्ट्रपती झाले आहेत.
नवाज शरीफ
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ हेदेखील आधी क्रिकेटपटू होते. नवाज शरीफ हे क्लब क्रिकेटपटू होते. क्लब क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केल्यामुळे त्यांना एक प्रथम श्रेणी मॅच खेळण्याचीही संधी मिळाली. १९७३-७४ साली नवाज शरीफ पाकिस्तान रेल्वेकडून पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सविरुद्ध मॅच खेळले. या मॅचमध्ये नवाज शरीफ शून्य रनवर आऊट झाले होते. यानंतर नवाज शरीफ कधीही प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले नाहीत. क्रिकेटनंतर नवाज शरीफ राजकारणात उतरले आणि पाकिस्तानचे पंतप्रधान झाले. सध्या शरीफ भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे जेलमध्ये आहेत.
अॅलेस डगलस
ब्रिटनचे पंतप्रधान होण्यापूर्वी अॅलेस डगलस इंग्लंडमध्ये प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले होते. क्रिकेट खेळणारे ते ब्रिटनचे एकमेव पंतप्रधान आहेत. अॅलेस डगलस मिडलसेक्स आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून १० प्रथम श्रेणी मॅच खेळले. ऑक्टोबर १९६३ ते ऑक्टोबर १९६४ पर्यंत अॅलेस डगलस ब्रिटनचे पंतप्रधान होते.
फ्रान्सिस बेल
फ्रान्सिस बेल हे मे १९२५ मध्ये अल्पावधीसाठी न्यूझीलंडचे पंतप्रधान झाले होते. बेल यांनी वेलिंग्टनसाठी दोन प्रथम श्रेणी मॅच खेळल्या होत्या. न्यूझीलंडचे तेव्हाचे पंतप्रधान विलियम मॅसी यांचं निधन झाल्यामुळे बेल यांना काळजीवाहू पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. निवडणुकीनंतर बेल यांनी पक्षाचा पंतप्रधान बनण्याचा प्रस्ताव नाकारला यानंतर गॉर्डन कोएंट्स पंतप्रधान झाले.
कामीसीस मारा
कामीसीस मारा फिजीचे क्रिकेटपटू होते. फिजीला इंग्लंडकडून स्वातंत्र्य मिळालं तेव्हा मारा तिकडचे मुख्यमंत्री होते. यानंतर २१ वर्षांपर्यंत मारा फिजीचे पंतप्रधान आणि ७ वर्ष राष्ट्रपती होते. मारा १९५३-५४ मध्ये फिजीकडून न्यूझीलंड दौऱ्यात ओटागो आणि केंटरबेरीविरुद्ध प्रथम श्रेणी मॅच खेळले. केंटरबेरीविरुद्धच्या मॅचमध्ये ४४ रन केल्यानंतर मारा यांचा हात तुटला. यामुळे त्यांना अर्धवट दौरा सोडून परतावं लागलं. यानंतर त्यांची क्रिकेट कारकिर्द संपुष्टात आली.