सेंच्युरियन टेस्टमध्ये केपटाऊनच्या या हिरोंवर राहणार सर्वांचे लक्ष
भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली पण या सामन्यात काही सामन्याचे हिरो समोर आले. या सामन्यातील हिरोंवर प्रेक्षकांसोबत प्रतिस्पर्धी संघाचेही लक्ष असणार आहे. पाहूया कोण आहेत ते सामन्याचे हिरो...
केपटाऊन : भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली पण या सामन्यात काही सामन्याचे हिरो समोर आले. या सामन्यातील हिरोंवर प्रेक्षकांसोबत प्रतिस्पर्धी संघाचेही लक्ष असणार आहे. पाहूया कोण आहेत ते सामन्याचे हिरो...
कगीसो रबाडा
कगीसो रबाडाने कॅपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून देण्यात मोठी भूमिका निभावली. त्याने सामन्यात एकूण पाच विकेट घेतल्या. या शानदार कामगिरीमुळे आयसीसी रँकिंगमध्ये तो पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे. फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरणाऱ्या रबाडाने २४ कसोटी सामन्यात २१.९६ च्या सरासरीने ११० विकेट घेतल्या आहेत. यात तीन वेळा १० विकेट आणि सात वेळा पाच विकेट घेतल्या आहेत.
हार्दिक पांड्या
हार्दिक पांड्याला ऑलराउंडर म्हणून भारतीय संघात सामील करण्यात आले. पांड्याने आपली कामगिरी चोख बजावली आहे. पहिल्या डावात त्याने एक विकेट घेतली तर ९५ चेंडूत शानदार ९२ धावा केल्या. या डावात बहुतांशी भारतीय फलंदाज अपयशी ठरले होते. दुसऱ्या डावात त्याने सहा ओव्हर्समध्ये दोन विकेट घेतल्या. पण त्याला फलंदाजीत एकही धावा काढता आली नाही. पण तरी देखील त्याच्यावर सर्वांच्या नजरा खिळलेल्या आहेत.
वर्नोन फिलँडर
केपटाऊन टेस्टच्या दुसऱ्या डावात वर्नोन फिलँडर याने भारतीय फलंदाजात खेळूच दिले नाही. फिलँडरची ही गोलंदाजी भारतीय खेळाडू कधीच विसरून शकणार नाही. कसोटी सामन्यात आफ्रिकेकडून फिलँडरचे खूप मानाचे स्थान आहे. टीम इंडिया सेंच्युरियनमध्ये फिलँडरचा सामना कशी करणारे हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
भुवनेश्वर कुमार
भुवनेश्वर कुमार याने केपटाऊन टेस्टमध्ये पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचे १२ धावांवर ३ गडी बाद केले. त्याच्या या कामगिरीमुळे दक्षिण आफ्रिकेचे धाबे दणाणले होते. भुवीने पहिल्या डावात १९ धावा देत चार विकेट घेतल्या होत्या, तर दुसऱ्या डावात दोन विकेट घेतल्या होत्या. तसेच त्याने पहिल्या डावात फलंदाजी करत महत्त्वपूर्ण २५ धावा काढल्या होत्या. दुसऱ्या डावात किल्ला लढवत ६२ चेंडूत खेळत नाबाद १३ धावा काढल्या होत्या.
एबी डिव्हिलिअर्स
एबी डिव्हिलिअर्सने केपटाऊन टेस्टमध्ये सिद्ध केले की त्याला भारतीय गोलंदाजांना खेळण्याचा अनुभव आहे. त्याने संपूर्ण सामन्यात एकूण १०० धावा काढत टेस्टमध्ये सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज बनला आहे. सेंच्युरियनमध्ये त्याच्यावर संघाची भिस्त राहणार आहे.
आर. अश्विन
केपटाऊन टेस्टमध्ये जलदगती गोलंदाजांचा दबदबा राहिला. पण पहिल्या डावात केवळ सात ओव्हर टाकणाऱ्या अश्विनने दोन विकेट पटकावल्या. दुसऱ्या डावात त्याला केवळ एक ओव्हर टाकण्याची संधी मिळाली. पहिल्या डावात त्याने ५३ चेंडू खेळत १२ धावा केल्या. तर दुसऱ्या डावात अश्विनने सर्वाधिक ८१ चेंडू खेळून सर्वाधिक ३७ धावा केल्या. सेंच्युरियमध्ये दक्षिण आफ्रिका अश्विनवर नजर ठेवून असणार आहे.