मुंबई : दिल्लीने आपल्या शानदार कामगिरीच्या जोरावर मुंबईला ११ धावांनी हरवले. यासोबतच मुंबईला प्ले ऑफमध्ये मात्र जागा मिळवता आली नाही. दिल्ली याआधीच प्ले ऑफमधून बाहेर गेली होती. मात्र मुंबईचा दिल्लीकडून पराभव झाल्याने गतविजेत्यांचे प्ले ऑफमध्ये जाण्याचे स्वप्न भंग पावले. या सामन्यात खरंतर मुंबईचे पारडेच जड होते. अनेकदा अशी स्थिती आली की असे वाटत होते की मुंबई हा सामना जिंकत प्ले ऑफमध्ये जागा मिळवणार मात्र दिल्लीने अखेरच्या क्षणी असे काही केले की मुंबईला जागा मिळवता आलीच नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीने टॉस जिंकताना पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला आणि मुंबईसमोर विजयासाठी १७५ धावांचे आव्हान ठेवले. मुंबईकडून खेळताना सलामीसाठी सूर्यकुमार यादवला (१२) पहिल्या ओव्हरमध्ये जीवदान मिळाले. मात्र या जीवदानाचा फारसा उपयोग झाला नाही. पहिल्या ओव्हरमधील चौथ्या चेंडूवर तो बाद झाला. मुंबईकडून फलंदाजांची कामगिरी तितकीशी चांगली झाली नाही. किरेन पोलार्डला केवळ ७ धावा करता आल्या. इवाव ल्युईसने ४८ धावा केल्या. १०व्या ओव्हरमधील पहिल्या चेंडूत पोलार्ड परतला. 


पॉवर प्लेमध्ये आपली स्थिती मजबूत करणारी मुंबई नंतरच्या ओव्हरमध्ये साफ कोसळली. पोलार्ड बाद झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा(१३) आणि कृणाल पांड्या यांनी डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना अपयश आले. मुंबईने पुन्हा कृणालच्या रुपाने विकेट गमावली. त्यानंतर रोहितने हार्दिक पांड्याच्या साथीने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र तोही जास्त काळ टिकला नाही. १४व्या ओव्हरमध्ये हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर रोहित बाद झाला. रोहित आणि हार्दिकने सहाव्या विकेटसाठी ४३ धावांची भागीदारी केली. 


रोहित बाद झाल्यानंतर दिल्लीच्या गोलंदाजांनी हार्दिकलाही मैदानावर टिकू दिले नाही. मिश्राने त्याला बाद झाला. हार्दिक जेव्हा बाद झाला तेव्हा संघाची धावसंख्या होती १२२. 


यानंतर मयंक मार्केंडेय(३)च्या साथीने बेन कटिंगने डाव सांभाळत संघाला विजयासमीप नेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो असफल ठरला. मुंबईला १२ चेंडूत विजयासाठी २३ धावांची आवश्यकता होता. धावसंख्या १५७ असताना बोल्टने मार्केंडेयला बाद करत मुंबईला आशांना मोठा धक्का दिला. अखेरच्या षटकांत मुंबईला विजयासाठी १८ धावांची गरज होती. यावेळी कटिंगने षटकार मारत मुंबईच्या आशा उंचावल्या. मात्र पुढच्याच चेंडूत तो बाद झाला. कटिंग जेव्हा बाद झाला तेव्हा संघाची धावसंख्या होती १६३. याच धावसंख्येवर हर्षलने जसप्रीत बुमराहला बोल्टद्वारे बाद केले. नेपाळचा युवा गोलंदाज संदीप लामिचाने, हर्षल पटेल आणि अमित मिश्राने तीन तीन विकेट मिळवल्या.