मुंबई : हिंदू असल्यामुळे पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियावर अन्याय झाल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट शोएब अख्तरने केला होता. खुद्द दानिश कनेरियानेही शोएब अख्तरच्या या वक्तव्याला दुजोरा दिला. यानंतर आता भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीरने या मुद्द्यावरुन पाकिस्तानवर टीका केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानचा हाच खरा चेहरा आहे. दुसरीकडे भारतामध्ये अल्पसंख्याक असूनही मोहम्मद अझहरुद्दीन एवढा कालावधी कर्णधार राहिला. पाकिस्तानकडून खेळलेले इम्रान खान हे त्यांचे आता पंतप्रधान आहेत, तरी पाकिस्तानला या सगळ्यातून जावं लागत आहे. हे लज्जास्पद आहे, असं वक्तव्य गौतम गंभीरने केलं आहे. 



या सगळ्या घटनाक्रमातलं सत्य आपण आता जगाला सांगणार आहोत. मी हिंदू असल्यानं टीममधले अनेक खेळाडू माझ्याशी बोलायचे देखील नाहीत. सुरूवातीला याबाबत बोलण्याचं धैर्य माझ्यात नव्हतं. मात्र आता त्या खेळाडूंची नावं आपण जाहीर करणार आहोत, अशी प्रतिक्रिया कनेरियानं व्यक्त केलीय.



दानिश कनेरिया हिंदू होता म्हणून त्याच्यावर अन्याय झाला. काही खेळाडूंना तर तो आमच्यासोबत का जेवतो? असाही आक्षेप होता, असं वक्तव्य शोएब अख्तरने एका टीव्ही शोदरम्यान केलं आहे.


या गोष्टीवरून माझं दोन-तीन खेळाडूंशी भांडण झालं. जर कोणी हिंदू असेल तर तोपण खेळेल. त्याच हिंदू असलेल्याने आम्हाला टेस्ट सीरिज जिंकवली. तो इकडून जेवण का घेतोय? असा प्रश्न एका खेळाडूने विचारला. तेव्हा तुला इकडून बाहेर फेकून देईन, असं मी त्याला ऐकवलं. कर्णधार असशील तु तुझ्या घरातला. तो तुम्हाला ६-६ विकेट घेऊन देतोय. इंग्लंडमध्ये दानिश आणि शमीने आम्हाला सीरिज जिंकवून दिली होती, असं शोएब अख्तर म्हणाला.



दानिश कनेरियाला त्याच्या उल्लेखनीय कामगिरीचं श्रेय देण्यात आलं नाही. दानिश कनेरियाला मिळालेली वागणूक चुकीची होती, असं शोएब अख्तरने कबूल केलं आहे.