पाकिस्तानी क्रिकेटर करणार भारतीय हिंदू तरुणीशी लग्न; लग्नाआधीच `ती` स्वीकारणार इस्लाम
Pakistani Cricketer To Marry Indian Hindu Girl: पाकिस्तानमधील क्रिकेटपटूंनी भारतीय महिलांशी लग्न करणं काही नवीन बाब नाही. मात्र यावेळेस लग्न करणारी भारतीय महिला लग्नाआधी धर्मांतर करणार आहे.
Pakistani Cricketer To Marry Indian Hindu Girl: पाकिस्तानमधील क्रिकेटपटू रझा हसन लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. विशेष म्हणजे रझा हसनची होणारी पत्नी भारतीय आहे. रझाने नुकतीच एंगेजमेंट केली आहे. रझाच्या होणाऱ्या पत्नीचं नाव पूजा बोमन असं आहे. या दोघांची एंगेजमेंट नुकतीच अमेरिकेतील न्यू यॉर्कमध्ये पार पडली. हे दोघे पुढील वर्षी लग्न बंधनात अडकणार आहेत.
लग्नाआधीच धर्म बदलणार भारतीय तरुणी
पूजा ही हिंदू धर्मीय आहे. मात्र लग्नापूर्वी पूजा धर्मांतर करुन इस्लाम धर्म स्वीकारणार आहे. मात्र हे धर्मांतर पूजा स्वइच्छेने करत आहे की तिला लग्नापूर्वी रझाने तशी अट घातली आहे यासंदर्भात कोणतीही माहिती मिळाली नसल्याचं पाकिस्तानी प्रसारमाध्यांचं म्हणणं आहे.
त्याने स्वत: जाहीर केलं
रझाने काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक पोस्ट केली होती. त्यामध्येच त्याने आपल्या एंगेजमेंटची घोषणा केली. "सांगायला आनंद होतोय की मी आता एंगेज आहे. तू आयुष्यभरासाठी माझी हो अशी मागणी मी तिला घातली आणि तिने होकार दिला आहे. भविष्यातील दोघांच्या एकत्रित वाटचालीसाठी फार उत्साही आहे," असं रझाने दोघांचा एंगेजमेंटमधील फोटो शेअर करत म्हटलं आहे.
या पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी भारतीय महिलांशी केली आहेत लग्नं
रझा हा मूळचा पाकिस्तानी असला तरी तो मागील काही वर्षांपासून तो अमेरिकेमध्ये स्थायिक झाला आहे. तो 32 वर्षांचा आहे. विशेष म्हणजे भारतीय महिलेशी लग्न करणारा रझा हा काही पहिला पाकिस्तानी क्रिकेटपटू नाही. यापूर्वी शोएब मलिक, हसन अली, मोसीन खान आणि जहीर अब्बास यांनीही भारतीय महिलांना आपला आयुष्यभराचा जोडीदार म्हणून निवडलं आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटूबरोबर लग्न करणाऱ्या सर्वात प्रसिद्ध भारतीय महिलेबद्दल बोलायचं झालं तर भारतीय टेनीसपटू सानिया मिर्झाचं नाव घ्यावं लागेल. काही महिन्यांपूर्वीच सानिया आणि शोएबचा घटस्फोट झाला आहे.
कसं होतं या खेळाडू करिअर?
रझा हसनने 2012 साली पाकिस्तानकडून अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तो पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. त्याचं करिअर फारच छोटं राहिलं. रझा हसन हा डावखुरा फिरकी गोलंदाज होता. तो एक एकदिवसीय सामना आणि 10 टी-20 सामने खेळला आहे. एकदिवसीय सामन्यात त्याने एक तर टी-20 सामन्यामध्ये पाकिस्तानसाठी 10 विकेट्स घेतल्या आहेत.
...म्हणून एवढं अल्प राहिलं करिअर
2012 च्या टी-20 वर्ल्ड कप संघामध्ये रझा हसनची निवड करण्यात आली होती. मात्र त्याला प्रभावशाली कामगिरी करता आली नाही. त्यानंतर निवड समितीने त्याच्याकडे कानाडोळा केल्याने केवळ एक एकदिवसीय सामना आणि 10 टी-20 सामन्यांमध्ये त्याचं करिअर संपुष्टात आलं. आता तो अमेरिकेत स्थायिक झाला आहे.