मुंबई : इंग्लंडमध्ये होणारा ५० ओव्हरचा वर्ल्ड कप काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. या वर्ल्ड कपसाठी प्रत्येक टीमने कसून सराव करायला सुरुवात केली आहे. या वर्ल्ड कपसाठी भारतीय टीम प्रबळ दावेदार नसून इंग्लंड या वर्ल्ड कपचा दावेदार आहे, असे वक्तव्य भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक सुनील गावसकर यांनी केले आहे. गावसकर 'इंडिया टुडे'शी बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आगामी वर्ल्ड कपचे आयोजन इंग्लंडमध्ये करण्यात आले आहे. त्यामुळे इंग्लंडसाठी ही जमेची बाजू आहे. सुनील गावसकर म्हणाले की, 'इंग्लंडची टीम वर्ल्ड कपची दावेदार आहे. वर्ल्ड कपचे आयोजन इंग्लंड मध्ये करण्यात आले आहे, म्हणून ते प्रमुख दावेदार असल्याचे माझे म्हणणे नाही, पण इंग्लंडनं वनडे क्रिकेट खेळण्याच्या त्यांचा दृष्टीकोन बदलला आहे. या बदललेल्या दृष्टीकोनामुळे इंग्लंड दावेदार आहे', असं गावसकर यांनी सांगितले.


'या आधी २०१५ साली झालेल्या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडचा साखळी सामन्यातच बांगलादेश कडून पराभव झाला होता. या पराभवामुळे इंग्लंडला स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं होतं. या पराभवातून इंग्लंडने धडा घेत संघाच्या कामगिरीत बदल केला आहे. त्यामुळे त्यांच्यातील विश्वासाची भावना वाढीस लागली आहे. हा विश्वास कौतुकास्पद आहे. त्यामुळे इंग्लंडचा संघ बळकट झाला आहे', असं गावसकर म्हणाले. 


'इंग्लंडची टीम परिपूर्ण आहे. त्यांच्याकडे सलामीवीरांची चांगली जोडी आहे. तसेच त्यांच्यातील मधल्या फळीतील फलंदाज देखील तगडे आहेत. इंग्लंडकडे ऑलराऊंडरचीही कमी नाही. जेव्हा आपण आपल्या देशात खेळतो, तेव्हा आपल्या पाठीशी आपल्या देशातील लोकांचा आधार असतो. तसेच परिस्थिती देखील अनुकूल असते. इंग्लंडकडे जॉस बटलर आणि जॉनी बेरेस्टो सारखे दोन चांगले कीपर देखील आहेत. त्यामुळे एकूणच इंग्लंडची टीम ही इतरांच्या तुलनेत वजनदार ठरत आहे, असं मत गावसकर यांनी मांडलं. 


'भारतीय टीम सलगपणे इंग्लंडमध्ये दोन वर्ष खेळली आहे. त्यामुळे या अनुभवाचा फायदा भारतीय खेळाडूं होऊ शकतो. भारतीय टीम २०१७ आणि २०१८ ला इंग्लंडमध्ये खेळले आहेत. भारताकडून वर्ल्ड कपसाठी ज्या खेळाडूंची निवड होईल त्या खेळाडूंना इंग्लंड मधील परिस्थिती माहिती आहे.. त्यांना तिथे खेळण्याचा अनुभव आहे. वर्ल्ड कपचं जेतेपद मिळवण्यासाठी भारतीय टीमला या अनुभवाचा फायदा होऊ शकतो', असं गावसकर यांना वाटतं. 


'भारताला फायदा होणार असला तरी, वर्ल्डकपसाठी प्रथम दावेदार हा इंग्लंड आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर भारतीय टीम आहे', अशी प्रतिक्रिया गावसकर यांनी दिली. भारतानं २०१७ ला इंग्लंड मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०१८ ला टी-२०, एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळली आहे.