लंडन : ५० ओव्हरचा वर्ल्ड कप आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. ३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होईल. या वर्ल्ड कपआधीच्या सराव सामन्यांच्या तिकीट विक्रीला १० एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. २४ मे ते २८ मेदरम्यान सराव सामने खेळवण्यात येतील. सराव सामन्यांमध्ये प्रत्येक टीम २ मॅच खेळणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सराव सामने हे २०१९ वर्ल्ड कपसाठीची अधिकृत स्टेडियम असलेल्या ब्रिस्टल काऊंटी ग्राऊंड, कार्डिफ वेल्स स्टेडियम, हॅम्पशायर बोल आणि ओव्हल याठिकाणी होतील. या सराव सामन्यांना आंतरराष्ट्रीय मॅचचा दर्जा नसेल. या सराव सामन्यांमध्ये प्रत्येक टीमला सगळ्या १५ खेळाडूंना खेळण्याची मुभा देण्यात आली आहे. पण फिल्डिंगवेळी मात्र फक्त ११ खेळाडूच मैदानात असतील.


सराव सामन्यांसाठीच्या तिकीटाची किंमत प्रौढांसाठी १५ पाऊंड आणि १६ वर्षांपेक्षा लहान मुलांसाठी १ पाऊंड एवढी आहे. क्रिकेट रसिकांना ही तिकीटं बुधवार १० एप्रिलला इंग्लंडच्या वेळेनुसार सकाळी १० वाजल्यापासून मिळतील. २०१९ क्रिकेट वर्ल्ड कपच्या अधिकृत वेबसाईटवरून ही तिकीटं विकत घेता येतील.


वेबसाईटबरोबरच सराव सामन्यांच्या दिवशी स्टेडियममध्येही तिकीट विक्री सुरु असेल, पण स्टेडियममधून तिकीटं विकत घेण्यासाठी ५ पाऊंड जास्त मोजावे लागतील. वर्ल्ड कपच्या सामन्यांची तिकीटं ज्यांना मिळाली नाहीत, त्यांना सराव सामन्यांमध्ये जगातले दिग्गज खेळाडू बघण्याची संधी मिळणार आहे.


३० मेपासून वर्ल्ड कपला सुरुवात होणार असून १४ जुलैला वर्ल्ड कपची फायनल खेळवण्यात येईल. 


वर्ल्ड कपमधले भारताचे सराव सामने


२५ मे- भारत विरुद्ध न्यूझीलंड


२८ मे- भारत विरुद्ध बांगलादेश


वर्ल्ड कपमधल्या भारताच्या मॅच


५ जून- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका


१३ जून- भारत विरुद्ध न्यूझीलंड


१६ जून- भारत विरुद्ध पाकिस्तान


२२ जून- भारत विरुद्ध अफगाणिस्तान


२७ जून- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज


३० जून- भारत विरुद्ध इंग्लंड


२ जुलै- भारत विरुद्ध बांगलादेश


६ जुलै- भारत विरुद्ध श्रीलंका


वर्ल्ड कपच्या ग्रुप स्टेजमधल्या सगळ्या मॅच या भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरू होतील. स्टार स्पोर्ट्सकडे वर्ल्ड कप मॅचच्या प्रसारणाचे अधिकृत अधिकार आहेत. तर मॅचचं लाईव्ह स्ट्रिमिंग हॉटस्टारवर बघता येईल.