चक दे इंडिया! भारतीय महिला हॉकी टीमचा कोच `कबीर खान`
भारतीय महिला हॉकी संघाच्या विजयानंतर प्रशिक्षकाच्या डोळ्यात अश्रू होते, पण हे अश्रू होते विजयाचे. हे अश्रू होते आनंदाचे
मुंबई: टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी टीम ने इतिहास रचला आहे. बलाढ्य ऑस्ट्रेलियाला नमवत भारतीय महिला हॉकी संघाने ऑलिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदाच सेमीफायनलमध्ये धडक मारली. भारतीय महिला हॉकी संघाच्या कामगिरीचं कौतुक होत आहे. महिला खेळाडूंनी मैदान गाजवलं खरं पण या विजयामागे आणखी एका व्यक्तीचा हात आहे.
तुम्हाला शाहरूख खानचा चक दे इंडिया सिनेमा आठवतच असेल. शाहरूखने साकारलेल्या प्रशिक्षक कबीर खानने महिला खेळाडूंमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. आपण जिंकू शकतो हा विश्वास दिला. ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघाच्या कामगिरीमागेही अशाच एका कबीर खानचा हात आहे. ती व्यक्ती आहे, भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक सोर्ड मारजेन.
चार वर्षांपूर्वी मारजेन यांनी मारजेन यांनी भारतीय महिला हॉकी संघाची सूत्र हाती घेतली. त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. त्यावेळी भारतीय महिला हॉकी संघ रिकाम्या हाताने मायदेशी परतली होती. संघातील अनेक सिनियर खेळाडूंनी निवृत्तीचा निर्णय घेतला होता. अशा परिस्थितीत मारजेन यांच्या हातात सूत्र देण्यात आली. मारजेन यांच्या समोर आव्हान होतं संघाला पुन्हा उभं करण्याचं. मारजेन यांनी हे आव्हान स्वीकारलं.
मारजेन यांनी एक मास्टर प्लान तयार केला. सर्वात आधी त्यांनी खेळाडूंच्या मानसिकतेवर अभ्यास केला. आपण जिंकू शकतो हा विश्वास त्यांनी खेळाडूंमध्ये निर्माण केला. मारजेन यांनी आखलेली रणनीती यशस्वी ठरतेय. आणि याचं उदाहरण आपल्याला मैदानावर दिसत आहे. भारतीय महिला खेळाडू एकजुटीने आणि जिंकण्याचा जिद्दीने खेळतायत.
उपान्त्यपूर्व फेरीत भारतीय महिला हॉकी संघाच्या विजयाचा सर्वाधिक आनंद झाला असेल तो प्रशिक्षक सोर्ड मारजेन यांना. विजयानंतर मारजेन यांच्या डोक्यात अश्रू होते. पण हे अश्रू होते विजयाचे, हे अश्रू होते आनंदाचे, हे अश्रू होते करोडो भारतीयांना दिलेल्या अभिमानाचे. म्हणूनच भारतीय महिला हॉकी संघाच्या या रिअल कबीर खान अर्थात सोर्ड मारजेन यांना करोडो भारतीयांचा सलाम.