Tokyo Olympics: सिंधूची विजयी घौडदौड सुरुच; हाँगकाँगच्या `चेंयुग गँन यी`चा पराभव
भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधूकडून पदक मिळवण्याच्या भारतीयांच्या आशा वाढल्या आहेत.
मुंबई : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला अजून एकंच पदक पटकावता आलं आहे. तर आता भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधूकडून पदक मिळवण्याच्या भारतीयांच्या आशा वाढल्या आहेत. आजच्या मॅचमध्ये पुन्हा एकदा पी.व्ही सिंधूने विजयाची नोंद केली आहे. सिंधूने हाँगकाँगच्या चेंयुग गँन यी हिचा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला आहे.
सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये विजयी सलामी दिली होती. त्यानंतर आज दुसऱ्या सामन्यात देखील विजय मिळवत तिच्या उत्तम कामगिरीत सातत्य राखलं आहे. सिंधूचा हा टोकियो ऑलिम्पिकमधील सलग दुसरा विजय आहे. या विजयामुळे सिंधूने नॉकआऊट फेरीमध्ये प्रवेश केला आहे.
आजच्या सामन्यात सिंधूचं वर्चस्व पहिल्यापासूनच पहायला मिळालं. सिंधूने पहिला सेट 21-9 अशा फरकाने जिंकला होता. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये हाँगकाँगच्या चेंन गँन यीने कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला यश मिळालं नाही. सिंधूने दुसरा सेट 21-16 अशा फरकासह जिंकत सामन्यात विजय मिळवला.
तर ग्रुप स्टेजच्या पहिल्या सामन्यातही तिने इस्त्रायलच्या पोलिकार्पोवाचा पराभव केला होता. पी व्ही सिंधूने पोलिकार्पोवाचा 21-7 आणि 21-10 अशा फरकाने पराभव केला होता. अवघ्या 29 मिनिटांमध्ये सिंधूने पहिला टोकियो ऑलिम्पिकचा पहिला सामना आपल्या नावावर केला होता. तर आता दुसरा सामना जिंकल्यानंतर सिंधूकडून भारतासाठी पदकाच्या आशा वाढल्या आहेत.