ट्रेंट बोल्टचा भन्नाट स्पेल; १५ चेंडूत टिपले ६ बळी
अवघ्या २० मिनिटांत श्रीलंकेचा खेळ खल्लास
क्राईस्टचर्च: न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात क्राईस्टचर्च येथे सुरु असणाऱ्या कसोटी सामन्यात गुरुवारी वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने शानदार कामगिरी केली. बोल्टच्या गोलंदाजीसमोर श्रीलंकेची फलंदाजी अक्षरश: पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. बोल्टने १५ चेंडूत श्रीलंकेचे सहा फलंदाज टिपले. बोल्टच्या या भन्नाट स्पेलमुळे श्रीलंकेचा डाव अवघ्या १०४ धावांत आटोपला. या कसोटीत आता न्यूझीलंडकडे ७४ धावांची आघाडी आहे. या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी श्रीलंकेने ४ बाद ८८ या धावसंख्येवरून डावाची सुरुवात केली. अँजलो मॅथ्यूज आणि रोशन सिल्व्हा यांनी सुरुवातीला सावधपणे खेळत धावसंख्या ९४ पर्यंत नेली. मात्र, यानंतर ट्रेंट बोल्टने श्रीलंकेचा डाव पूर्णपणे उद्ध्वस्त केला. त्याने सर्वप्रथम रोशन सिल्व्हाला स्लीपमध्ये झेलबाद करवले. या षटकात त्याने रिव्हर्स स्विंगची कमाल दाखवत आणखी दोन बळी घेतले.
यानंतर बोल्ट पुन्हा गोलंदाजीसाठी आला तेव्हा त्याने निरोशन डिक्वेला बळी मिळवला. त्यापाठोपाठ दिलरुवान परेरा आणि सुरंगा लकमल यांना पायचीत करून बोल्टने अवघ्या १०४ धावांवर श्रीलंकेचा गाशा गुंडाळला. श्रीलंकेच्या शेवटच्या चार फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही.
बोल्टचा हा २० मिनिटांचा स्पेल न्यूझीलंडच्या संघासाठी स्वप्नवतच ठरला. आतापर्यंतच्या कारकीर्दीतील बोल्टची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. श्रीलंकेचे फलंदाज एकापाठोपाठ तंबूत परतत असताना अँजलो मॅथ्यूज खेळपट्टीवर हताशपणे उभा होता. यापूर्वी मार्च महिन्यात ट्रेंट बोल्टने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात ३२ धावांमध्ये सहा बळी टिपण्याची किमया करुन दाखवली होती.