शाहिद आफ्रिदीला पाचवं कन्यारत्न; नेटकऱ्यांकडून मोलाचा सल्ला...
काहींनी त्याला शुभेच्छा दिल्या. पण...
मुंबई : माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या कुटुंबात एका नव्या पाहुणीचा प्रवेश झाल्याची आनंदवार्ता सांगितली. आपण पाचव्यांदा बाबा झाल्याची बातमी सांगणारा हा खेळाडू म्हणजे शाहिद आफ्रिदी. अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याने या क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख प्रस्थापित केली. असा हा खेळाडू पाचव्यांदा बाप झाल्याबदद्ल काहींनी त्याला शुभेच्छा दिल्या. पण, त्याला काही नेटकऱ्यांकडून उडवल्या गेलेल्या खिल्लीचाही सामना करावा लागला.
'एका अनोख्या शक्तीचा माझ्यावर आशीर्वाद आहे. मला यापूर्वीच चार मुली होत्या. आता पुन्हा एकदा मला पाचवं कन्यारत्न झालं आहे. ही आनंदाची बातमी मी माझ्या हितचिंतकांसोबत शेअर करु इच्छितो', असं ट्विट त्याने केलं. #FourbecomeFive असा हॅशटॅग लिहित त्याने आपल्या नवजात मुलीचा फोटोही शेअर केला. ज्यामध्ये त्याच्या चारही मुलीसुद्धा दिसत आहेत.
आफ्रिदीने हा फोटो शेअर केल्यानंतर काही क्षणांतच त्याचं हे ट्विट आणि फोटो व्हायरल झालं. पाहता पाहता आफ्रिदी चर्चेचा विषय ठरला. अनेकांनी त्याच्यावर टीका करत त्याची खिल्लीही उडवण्यास सुरुवात केली. 'तुला लोकसंख्या वाढीचा मुद्दा कधी कळणार?, की तू फक्त मुलगा हवा म्हणून हे करतोयस?', अशा शब्दात आफ्रिदीवर टीका करत त्याने आता मुलं हवी असल्यास किमाल एखाद्या अनाथ मुलाला दत्तकच घ्यावं असा सल्ला दिला.
पाहा : देवाब्राह्मणाच्या नव्हे, संविधानाच्या साक्षीने अभिनेत्याने बांधली लग्नगाठ
तुझ्या देशामध्ये आर्थिक संकट असताना, खाण्यापिण्याची आबाळ असताना तू हे काय करत आहेस? अशा शब्दांतही त्याच्यावर निशाणा साधला गेला. काहींनी थेट आफ्रिदीच्या मानसिकतेवरच निशाणा साधला. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी उचलून धरलेला हा मुद्दा आणि त्यावरुन सुरु असणारं हे चर्चासत्र पाहता शाहिद आफ्रिदी याला काही उत्तर देणार का, याकडे साऱ्यांचं लक्ष आहे.