जोहान्सबर्ग : आयसीसीच्या अंडर-१९ क्रिकेट वर्ल्ड कपला आजपासून सुरुवात होत आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये खेळवण्यात येणाऱ्या या स्पर्धेत १६ देशांचा सहभाग आहे. भारतीय टीम प्रियम गर्गच्या नेतृत्वात वर्ल्ड कप खेळणार आहे. मागच्यावेळी पृथ्वी शॉच्या नेतृत्वात भारताने अंडर-१९ वर्ल्ड कप जिंकला होता. यावेळी वर्ल्ड कपची ही ट्रॉफी वाचवण्यासाठी भारतीय टीम मैदानात उतरेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंडर-१९ वर्ल्ड कपचा हे १३वं सत्र आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या १६ टीमना ४ ग्रुपमध्ये टाकण्यात आलं आहे. ग्रुप एमध्ये भारत, न्यूझीलंड, श्रीलंका आणि जपान आहे. ग्रुप बीमध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि नायजेरिया, ग्रुप सीमध्ये पाकिस्तान, बांगलादेश, स्कॉटलंड आणि झिम्बाब्वे, ग्रुप डीमध्ये दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, कॅनडा आणि युएई या टीमचा समावेश आहे.


अंडर-१९ वर्ल्ड कपसाठी भारतीय टीम निवडण्यात राहुल द्रविडने महत्त्वाची भूमिका बजावली होती. राहुल द्रविड अंडर-१९ टीमचा प्रशिक्षक होता. राहुल द्रविड प्रशिक्षक असतानाच भारताने मागचा अंडर-१९ वर्ल्ड कप जिंकला होता. राहुल द्रविड हा सध्या एनसीएचा प्रमुख आहे.


अंडर-१९ वर्ल्ड कपमध्ये १६ टीमच्या ४८ मॅच होणार आहेत. २६ दिवस ही स्पर्धा चालणार आहे. पहिली मॅच दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानमध्ये होणार आहे. भारताची पहिली मॅच रविवारी १९ जानेवारीला श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. स्पर्धेची फायनल मॅच ९ फेब्रुवारीला होईल.


अंडर-१९ वर्ल्ड कपमधल्या भारताच्या मॅच


१९ जानेवारी- भारत विरुद्ध श्रीलंका


२१ जानेवारी- भारत विरुद्ध जपान


२४ जानेवारी- भारत विरुद्ध न्यूझीलंड


भारतीय टीमने ४ वेळा अंडर-१९ वर्ल्ड कप जिंकला आहे. २०००, २००८, २०१२ आणि २०१८ साली भारताने अंडर-१९ वर्ल्ड कप जिंकला होता.


भारतीय टीम 


प्रियम गर्ग (कर्णधार), ध्रुव चंद जुरेल (विकेट कीपर/उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, दिव्यांश सक्सेना, शाश्वत रावत, दिव्यांश जोशी, शुभांग हेगडे, रवी बिश्नोई, आकाश सिंग, कार्तिक त्यागी, अर्थव अंकोलकर, कुमार कुशाग्र (विकेट कीपर), सुशांत मिश्रा, विद्याधर पाटील