पॉचफेस्टरूम : अंडर-१९ वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये बांगलादेशने भारतावर ३ विकेटने विजय मिळवला, आणि वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं. आयसीसीची स्पर्धा जिंकण्याची बांगलादेशची ही पहिलीच वेळ आहे. पण बांगलादेशच्या खेळाडूंनी विजयानंतर मैदानावर उन्माद केला. बांगलादेशच्या खेळाडूंचं हे वागणं आता आयसीसीच्या रडारवर आलं आहे. या गैरवर्तणुकीमुळे बांगलादेशच्या खेळाडूंवर कारवाई होण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयसीसी या प्रकरणाचा व्हिडिओ पाहिल आणि मग पुढचं पाऊल उचलेल, असं टीम इंडियाचे मॅनेजर अनिल पटेल म्हणाले. मॅच संपल्यानंतर बांगलादेशी खेळाडूंच्या वर्तनाबद्दल मी मॅच अधिकाऱ्यांशी बोललो, असं अनिल पटेल यांनी सांगितलं.



अथर्व अंकोलेकरच्या बॉलिंगवर विजयी रन काढल्यानंतर जल्लोष करण्यासाठी बांगलादेशचे खेळाडू मैदानात पोहोचले. मैदानात आल्यानंतर बांगलादेशचा एक खेळाडू भारतीय खेळाडूसमोर उभा राहिला. बांगलादेशच्या या खेळाडूने भडकाऊ वक्तव्यं केली, यानंतर दोन्ही टीमच्या खेळाडूंमध्ये बाचाबाची सुरु झाली. भारतीय खेळाडूंनी आक्षेपार्ह वक्तव्यं करणाऱ्या बांगलादेशच्या खेळाडूला लांब केलं. वाद वाढल्यानंतर अंपायर मध्यस्ती करायला आले, अशी माहिती आहे.


'खेळामध्ये या गोष्टी होतच असतात. काही वेळा तुमचा पराभव होतो, तर काही वेळा तुम्ही जिंकता. पण त्यांची प्रतिक्रिया गलिच्छ होती. या गोष्टी घडायला नको होत्या,' असं भारताचा कर्णधार प्रियम गर्ग म्हणाला.


बांगलादेशचा कर्णधार अकबर अलीने या गोष्टी दुर्भाग्यपूर्ण असल्याचं सांगितलं. तसंच त्याने खेळाडूंच्या वागण्यावर खेद व्यक्त केला. या गोष्टी घडायला नको होत्या. प्रतिस्पर्धी टीमचा आणि खेळाचा आम्ही आदर केलाच पाहिजे, अशी प्रतिक्रिया बांगलादेशचा कर्णधार अकबर अलीने दिली.


वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये बांगलादेशच्या बॉलरनी उल्लेखनीय कामगिरी करत भारताला १७७ रनवर ऑल आऊट केलं. यशस्वी जयस्वालने सर्वाधिक ८८ रनची खेळी केली. भारताच्या शेवटच्या ७ विकेट फक्त २२ रनवर गेल्या. भारताच्या या आव्हानाचा पाठलाग बांगलादेशने ४२.१ ओव्हरमध्ये १७० रन करून पूर्ण केला. पावसामुळे बांगलादेशला विजयासाठी ४६ ओव्हरमध्ये १७० रनचं आव्हान मिळालं होतं.