लंडन : टी-२० आणि वनडे सीरिजनंतर आता भारत आणि इंग्लंडमध्ये ५ टेस्ट मॅचच्या सीरिजला सुरुवात होणार आहे. १ ऑगस्टला या सीरिजची पहिली टेस्ट मॅच खेळवण्यात येईल. पण त्याआधी खेळवण्यात येणाऱ्या सराव सामन्यामध्ये भारतीय टीमचं नाराजी नाट्य पाहायला मिळालं. खेळपट्टी आणि मैदान खेळण्यासाठी साजेसं नसल्याचं सांगत भारतीय टीमनं ४ दिवसांचा सराव सामना तीन दिवसच खेळायचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. मंगळवारी दुपारी नेट प्रॅक्टिस केल्यानंतर भारतीय टीम व्यवस्थापनानं खेळपट्टी बघितली आणि हा निर्णय घेतला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खेळपट्टी बघितल्यानंतर भारताचा मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री मैदानातल्या कर्मचाऱ्यांशी बोलताना दिसला. रवी शास्त्रीबरोबर बॉलिंग प्रशिक्षक भारत अरुण आणि सहाय्यक प्रशिक्षक संजय बांगरही मैदानात होते. खेळपट्टीवरचं गवत आणि खराब मैदानामुळे खेळाडूंना दुखापत होऊ शकते, अशी चिंता भारतीय टीम व्यवस्थापनानं व्यक्त केली.


बुधवारपासून सुरु होणाऱ्या या मॅचमध्ये भारत टीममध्ये सगळे १८ खेळाडू वापरणार आहे. मैदानतल्या कर्मचाऱ्यांनी भारतीय टीम व्यवस्थापनाच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे खेळपट्टीवरचं गवत काढलं जाऊ शकतं. या मॅचचा चौथा दिवस शनिवारी येणार असल्यामुळे अनेकांनी तिकीटं विकत घेतली होती. पण आता चौथ्या दिवशी मॅच होणार नसल्यामुळे या प्रेक्षकांची निराशा झाली आहे.


नेट प्रॅक्टिससाठी देण्यात आलेल्या दोन खेळपट्ट्यांवर अजिबात गवत नव्हतं पण सराव सामन्यासाठीच्या खेळपट्टीवर गवत असल्यामुळेही भारतीय टीम व्यवस्थापन नाराज होतं. या नाराजीनंतर आता खेळपट्टीवरचं गवत काढण्यात येणार आहे.


भारतीय टीमचा सराव


भारतीय टीमनं जवळपास ४ तास सराव केला. भारतीय खेळाडून दोन बॅचमध्ये मैदानात आले होते. सगळ्या बॅट्समन आणि बॉलरनी कसून सराव केला. चेतेश्वर पुजारा, मुरली विजय आणि विराट कोहलीनं तर स्लिपमध्ये कॅच पकडण्याचाही सराव केला. जसप्रीत बुमराहच्या डाव्या बोटाला फ्रॅक्चर असतानाही तो मैदानात उतरला होता. तर शिखर धवननं बाऊन्सर बॉलवर सराव केला.


तीन दिवसांचा सराव सामना संपवल्यावर भारतीय टीम शनिवारी बर्मिंगहमला जाईल आणि तिकडे १ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या टेस्ट मॅचसाठी सराव करेल.