मुंबई : टीम इंडिया लवकरच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया कसोटी आणि वनडे मालिका खेळवण्यात येणार आहे. कसोटी मालिकेसाठी दोन्ही  संघाची घोषणा करण्यात आली आहे. तर एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा होणं बाकी आहे. मात्र याआधी सलामीवीर शिखर धवनचं संघातील स्थान धोक्यात आलं आहे. त्याचं कारण आहे वेंकटेश अय्यर आणि ऋतुराज गायकवाड या दोन युवा सलामीवीर फलंदाजांची कामगिरी. (Venkatesh Iyer and Ruturaj Gaikwad likely to get a chance in ODI series against South Africa)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दोन्ही फलंदाजांनी सुरु असलेल्या विजय हजारे स्पर्धेत आतापर्यंत धमाकेदार फलंदाजी केली आहे. यामुळे आफ्रिका विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी या दोघांनी प्रबळ दावेदारी सिद्ध केली आहे. एका बाजूला हे दोघेही खेळाडू धमाका करतायेत. तर दुसऱ्या बाजूला याच स्पर्धेत दिल्लीकडून खेळणाऱ्या शिखर धवनला छाप सोडता आलेली नाही. त्यामुळे धवनचं स्थान धोक्यात असल्याचं म्हंटलं जातंय.     


ऋतुराज आणि वेंकटेशचा तडाखा


सध्या सुरु असलेल्या विजय हजारे स्पर्धेत ऋतुराजने सलग 3 शतकं लगावली आहेत. तर वेंकटेशनेही 2 वेळा खणखणीत शतक झळकावलं आहे. वेंकटेशने बॅटिंगसह बॉलिंगनेही धमाका केलाय. वेंकटेशने 5 विकेट्स ही घेतल्या आहेत. त्यामुळे सलामीवीर आणि ऑलराऊंडर म्हणून वेंकटेश हा परिपूर्ण खेळाडू आहे. त्यामुळे वेंकटेश हा हार्दिक पंड्याचीही उणीव भरुन काढू शकतो.   


"वेंकटेश निश्चितच आफ्रिका दौऱ्यावर जात आहे. तो प्रत्येक सामन्यात 9 ते 10 ओव्हर बॉलिंग करतो. त्यामुळे हार्दिकची जागा भरुन काढण्यासाठी वेंकटशला संधी देण्याची अचूक वेळ आहे", अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्राने गोपनियतेच्या अटीवर  दिली.  


"निवड समितीने वेंकटेशला मधल्या फळीत खेळण्याचा अचूक सल्ला देत चांगला काम केलं आहे. वेंकटेशला जर दुखापत नाही झाली, तर तो निश्चितच आफ्रिका विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत असेल", असंही या सूत्राने म्हंटलं. 


ऋतुराजही प्रबळ दावेदार 


महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराजने त्याचा आयपीएलपासूनचा फॉर्म हा आतापर्यंत कायम ठेवलाय. त्यामुळे त्यानेही निवड समितीची डोकेदुखी वाढवलीये. ऋतुराज श्रीलंका विरुद्धच्या 2 टी 20 सामन्यात खेळला होता. मात्र त्याला वनडेत खेळण्याची संधी मिळाली नव्हती. 


धवनला संधी मिळणार? 


धवनने सुरु असलेल्या विजय हजारे स्पर्धेत दिल्लीकडून 12, 14 आणि 18 धावांची खेळी केली आहे. ज्या प्रमाणे कसोटीत कोच राहुल द्रविडने अपयशी अजिंक्य रहाणे आणि इशांत शर्माला पुन्हा संधी दिली होती. त्यामुळे द्रविड धवनला आणखी एक संधी देऊ शकतो, अशी शक्यता आहे.  


"धवनमध्ये जोरदार पुनरागमन करत धावा करण्याची क्षमता आहे. त्यामुळे निवड समिती शिखरला अखेरची संधी देईल", असंही सूत्राने म्हंटलं. त्यामुळे आता निवड समिती नेमकं कोणावर विश्वास दाखवणार याकडे लक्ष असणार आहे.