नागपूर : अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीम फायनलमध्ये पोहोचली असतानाच अंडर १९ कूच बिहार ट्रॉफीमध्येही विक्रम झाला आहे. अंडर १९ कूच बिहार ट्रॉफीच्या फायनलमध्ये विदर्भाच्या अथर्व तायडेनं शानदार ३२० रन्सची खेळी केली. ४८३ बॉल्समध्ये खेळलेल्या या मॅरेथॉन खेळीमध्ये अथर्वनं ३४ फोर आणि १ सिक्स मारली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाची कूच बिहार अंडर १९ ट्रॉफीची फायनल नागपूरमध्ये विदर्भ आणि मध्य प्रदेश यांच्यामध्ये झाली. अथर्वच्या या त्रिशतकामुळे विदर्भानं ६१४ रन्स केल्या. त्यामुळे विदर्भाला ३२५ रन्सची आघाडी मिळाली. यानंतर विदर्भानं मध्य प्रदेशला १७६ रन्सवर ऑल आऊट केलं आणि कूच बिहार ट्रॉफी फायनल इनिंगनं जिंकली.


युवराज सिंगनंही केलं होतं त्रिशतक


अथर्व तायडेच्या या खेळीमुळे युवराज सिंगच्या खेळीची आठवण झाली. १९९९-२००० सालच्या कूच बिहार ट्रॉफीच्या फायनलमध्ये युवराज सिंगनंही त्रिशतक झळकावलं होतं. बिहारविरुद्ध झालेल्या या मॅचमध्ये पंजाबकडून खेळणाऱ्या युवराजनं ३५८ रन्स केले होते. यानंतर पंजाबच्या बॉलर्सनी बिहारला ३५७ रन्सवरच ऑल आऊट केलं होतं. या मॅचनंतर युवराज अंडर १९ वर्ल्ड कप खेळला आणि जगाला युवराज सिंग दिसला.