ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२०मध्ये भारताचा ४ रननं पराभव झाला. हळू सुरुवात केल्यानंतर क्रिस लिन आणि ग्लेन मॅक्सवेलनं फटकेबाजी केली. या दोघांच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारता आली. ग्लेन मॅक्सवेलनं मारलेला एक बॉल तर थेट स्पायडर कॅमलाच जाऊन लागला. ग्लेन मॅक्सवेल ९व्या ओव्हरमध्ये बॅटिंगला आला. तेव्हा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंच २७ रनवर आऊट झाला होता. फिंच आऊट झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाचा स्कोअर ६४/२ होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसऱ्या बाजूनं क्रिस लिन जलद रन करत होता. पण ११ व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलला कुलदीप यादवनं लिनची विकेट घेतली. यानंतर बॅटिंगला आलेल्या स्टॉयनीसनं फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाचा स्कोअर १००च्या पुढे नेला. स्टॉयनीसबरोबर मॅक्सवेलनंही फटके मारायला सुरुवात केली. १४ व्या ओव्हरमध्ये मॅक्सवेलनं कृणाल पांड्याला लागोपाठ ३ सिक्स मारले.


विराटनं पुन्हा एकदा कृणाल पांड्याला १६वी ओव्हर दिली. या ओव्हरमध्येही मॅक्सवेलनं हल्ला केला. ओव्हरच्या पाचव्या बॉलला मॅक्सवेलनं सिक्स मारली. सहाव्या बॉललाही त्यानं सिक्स मारण्याचा प्रयत्न केला, पण बॉल स्पायडर कॅमेराला जाऊन लागला. अंपायरनं हा डेड बॉल दिला.



यानंतर १७ व्या ओव्हरमध्ये पाऊस पडायला सुरुवात झाली आणि खेळ थांबला. ऑस्ट्रेलियानं १६.१ ओव्हरमध्ये ३ विकेट गमावून १५३ रन केले होते. मॅक्सवेलनं २०० च्या स्ट्राईक रेटनं ४ सिक्ससोबत २३ बॉलमध्ये ४६ रन केले. मार्कस स्टॉयनीसनं ३ फोर आणि १ सिक्सच्या मदतीनं ३१ रन केले.