वेलिंग्टन : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये ४-१नं विजय मिळवल्यानंतर भारतीय टीमनं टी-२० सीरिजमध्ये निराशाजनक सुरुवात केली आहे. पहिल्या टी-२०मध्ये भारताचा ८० रननी पराभव झाला. या मॅचआधी भारतीय टीमनं जोरदार सरावही केला होता. असाच सराव करतानाचा ऋषभ पंतचा एक व्हिडिओ बीसीसीआयनं ट्विटरवर शेअर केला आहे. ऋषभ पंतनं मारलेला हा शॉट पाहून तुम्हीही हैराण व्हाल. सराव करत असताना ऋषभ पंतनं स्विच हिट मारण्याचा प्रयत्न केला. 'टी-२० प्रकारामध्ये तुमचं स्वागत आहे. ऋषभ पंतच्या या शॉटला तुम्ही काय म्हणाल?' असं कॅप्शन बीसीसीआयनं या व्हिडिओला दिलं आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मॅचआधी ऋषभ पंतनं जोरदार सराव केला असला तरी त्याला पहिल्या टी-२०मध्ये मात्र चमकदार कामगिरी करता आली नाही. या मॅचमध्ये पंत १० बॉलमध्ये ४ रन करून आऊट झाला. काहीच दिवसांपूर्वी आयसीसीनं पंतला उदोयन्मुख खेळाडूचा पुरस्कार दिला होता. ऋषभ पंतला एमएस धोनीचा उत्तराधिकारी म्हणून पाहिलं जात आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियातल्या टेस्ट सीरिजमध्ये ऋषभ पंतनं उत्कृष्ट कामगिरी केली होती.


ऋषभ पंतनं आत्तापर्यंत ९ टेस्ट मॅचमध्ये ४९.७१ च्या सरासरीनं ६९६ रन केल्या आहेत. यामध्ये २ शतकं आणि २ अर्धशतकांचा समावेश आहे. ऋषभ पंतनं एक शतक हे इंग्लंडमध्ये आणि दुसरं शतक ऑस्ट्रेलियामध्ये केलं. टेस्टमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या ऋषभ पंतला अजून वनडे आणि टी-२०मध्ये सिद्ध करता आलेलं नाही. पंतनं ३ वनडेमध्ये २०.५० च्या सरासरीनं ४१ रन केल्या आहेत. तर १० आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये पंतनं १९.६२ च्या सरासरीनं १५७ रन केले. यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे.