मुंबई : भारतीय टीम ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या मोठ्या दौऱ्यावरून भारतात परत आली आहे. आता भारतीय खेळाडू स्वत:च्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. रोहित शर्माचा त्याच्या कुटुंबासोबतचे दोन व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रोहित शर्मा डिसेंबरमध्ये बाप बनला आहे. रोहितची पत्नी रितीका सजदेहनं एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. मुलीच्या जन्मानंतर रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौरा अर्धवट सोडून भारतात आला होता. मुलीला आणि पत्नीला भेटल्यानंतर रोहित परत ऑस्ट्रेलियाला गेला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्मानं न्यूझीलंड दौऱ्यातील शेवटच्या २ वनडे आणि ३ टी-२० मॅचच्या सीरिजमध्ये भारताचं नेतृत्वही केलं होतं. टी-२० सीरिजमध्ये रोहितनं भारताकडून सर्वाधिक ८९ रन केले होते. या सीरिजमध्ये अर्धशतक करणारा रोहित एकमेव भारतीय बॅट्समन होता. या सीरिजमध्ये भारताचा २-१नं पराभव झाला. या सीरिजमधली एकमेव मॅच भारत जिंकला, ज्यामध्ये रोहितनं अर्धशतक केलं होतं.


प्रशिक्षक रवी शास्त्रींनी दिलेल्या संकेतानुसार ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० आणि वनडे सीरिजमध्ये रोहितला आराम दिला जाऊ शकतो. रोहित शर्मा हा सध्या सुट्टी एन्जॉय करण्याच्या मूडमध्ये आहे. रोहित शर्माच्या मुलीचे दोन व्हिडिओ सध्या व्हायरल झाले आहेत. यातला एक क्यूट व्हिडिओ रोहितची पत्नी रितीका सजदेहनं इन्स्टाग्रामवर टाकला आहे. या व्हिडिओमध्ये समायरा डोळे बंद करून हसताना दिसत आहे.



ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याला २४ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया भारताविरुद्ध २ टी-२० आणि ५ वनडे मॅचची सीरिज खेळेल. वर्ल्ड कप २०१९ आधी भारताची ही शेवटची सीरिज आहे. या सीरिजनंतर आयपीएल सुरु होईल, आणि यानंतर ३० मेपासून वर्ल्ड कपला सुरुवात होईल.