मुंबई : भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मानं त्याची देशभक्ती मैदानात दाखवली. भारत आणि वेस्ट इंडिजमधल्या चौथ्या वनडेमध्ये रोहित बाऊंड्री लाईनवर उभा होता. त्यावेळी प्रेक्षक रोहित-रोहित म्हणत जल्लोष करत होते. पण रोहितनं या प्रेक्षकांकडे बघून इशारा केला. रोहित-रोहित म्हणू नका इंडिया-इंडिया म्हणा, असं रोहितनं या प्रेक्षकांना सांगितलं. यानंतर प्रेक्षक इंडिया-इंडिया म्हणत जल्लोष करू लागले. रोहितचा हा व्हिडिओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि वेस्ट इंडिजमधली चौथी वनडे मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर झाली. या मॅचमध्ये रोहित शर्मानं शानदार शतक केलं. रोहितनं १३७ बॉलमध्ये १६२ रन केले होते. या सीरिजमधलं रोहितचं हे दुसरं शतक होतं. तर वनडे क्रिकेटमधलं हे त्याचं २१वं शतक होतं. मागच्या ८ मॅचपैकी ३ मॅचमध्ये रोहितनं शतकं केली आहेत. यातल्या २ वेळा रोहितनं १५० पेक्षा जास्त रन केले आहेत. वनडेमध्ये सर्वाधिक वेळा १५० पेक्षा जास्त रन करण्याचा आणि सर्वाधिक वेळा द्विशतक करण्याचा रेकॉर्डही रोहितच्या नावावर आहे.


रोहित शर्माच्या सर्वाधिक सिक्स


२०१८ साली रोहित शर्मानं सर्वाधिक सिक्स मारले आहेत. रोहितनं यावर्षी खेळलेल्या १८ मॅचमध्ये ३५ सिक्स लगावले आहेत. या यादीत इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो(३१ सिक्स) दुसऱ्या क्रमाकांवर, वेस्ट इंडिजचा शिमरोन हेटमेयर(२९) तिसऱ्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिजच्या क्रिस गेलनं फक्त ९ मॅच खेळल्या असल्या तरी त्यानं तब्बल २२ सिक्स मारले आहेत. या यादीत गेल चौथ्या क्रमांकावर आहे.


रोहित शर्मानं या मॅचमध्ये ४ सिक्स मारले. रोहितच्या नावावर आता वनडेमध्ये १९८ सिक्स आहेत. रोहितनं सचिन तेंडुलकरचं १९५ सिक्सचं रेकॉर्ड मोडलं आहे. वनडेमध्ये सर्वाधिक सिक्स मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित दुसऱ्या क्रमांकावर आहे. धोनीनं भारताकडून सर्वाधिक (२८१ इनिंगमध्ये २१८ सिक्स) मारले आहेत.