मुंबई : माजी क्रिकेटपटू विनायक सामंत यांची मुंबईच्या टीमचे प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. विनायक सामंत हे मुंबईचे माजी विकेट कीपर होते. सामंत यांच्याबरोबरच विल्कीन मोटा यांची मुंबईच्या अंडर १९ टीमचे प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए)चे संयुक्त सचिव उन्मेश खानविलकर यांनी ही घोषणा केली. मुंबई टीमच्या प्रशिक्षक निवडीसाठी दोन दिवसांची बैठक झाली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचा माजी विकेट कीपर समीर दिघे यांनी एका मोसमानंतर मुंबईच्या प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला होता. विनायक सामंत, राजस्थानचे माजी क्रिकेटपटू प्रदीप सुंदरम आणि भारताचा माजी क्रिकेटपटू रमेश पोवार मुंबई टीमचा प्रशिक्षक होण्याच्या शर्यतीत होते. पण सामंत यांची निवड करण्यात आली. ४६ वर्षांच्या विनायक सामंत यांनी १०१ प्रथम श्रेणी मॅच खेळल्या आहेत. यामध्ये त्यांनी ३,४९६ रन केल्या. नाबाद २०० हा त्यांचा सर्वाधिक स्कोअर आहे.


विनायक सामंत यांनी मुंबई आणि त्रिपुराकडून क्रिकेट खेळलं. मुंबईचा प्रशिक्षक होणं ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे. ही जबाबदारी मिळाल्यामुळे मी आनंदी आहे. मला मिळालेली जबाबदारी मी पूर्ण करीन आणि योग्य निकाल देईन, असं विनायक सामंत म्हणाले. सामंत प्रशिक्षक असताना मुंबईनं अंडर २३ चॅम्पियनशीप जिंकली होती.


रमेश पोवारची मुंबईचा प्रशिक्षक म्हणून का निवड झाली नाही असा सवाल उन्मेश खानविलकर यांना विचारण्यात आला. तांत्रिक अडचणींमुळे रमेश पोवारची निवड करता आली नाही. राजीनामा दिलेल्या व्यक्तीचा पुन्हा विचार करण्यात येऊ नये असा ठराव समितीनं पास केल्यामुळे रमेश पोवारला संधी देता आली नाही, असं खानविलकर म्हणाले. याच वर्षी रमेश पोवार यानं एमसीए अॅकेडमीच्या स्पिन बॉलिंग प्रशिक्षकपदाचा मध्येच राजीनामा दिला होता.