दिल्लीत पुन्हा `दंगल`..! पोलिसांनी रोखल्यावर विनेश फोगाटने रस्त्यावरच ठेवला अर्जून अवॉर्ड
Vinesh Phogat left Arjun Award on Road : मला देण्यात आलेला मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार आणि अर्जुन पुरस्कार परत करत आहेत. या अवस्थेत पोहोचवण्यासाठी खुप खुप आभार, असं विनेश फोगाटने दोन दिवसांपूर्वी मोदींना (PMO) लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं.
Vinesh Phogat return Arjun Award : गेल्या काही दिवसांपासून कुस्तीच्या आघाड्यातील 'दंगल' थांबण्याचं नाव घेत नाहीये. कुस्तीपट्टू साक्षी मलिकची निवृत्ती आणि बजरंग पुनियाने पद्मश्री पुरस्कार परत करण्याची घोषणा केल्यानंतर आता महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने (Vinesh Phogat) आपला अर्जुन अवॉर्ड सरकारला परत केला आहे. महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिने आपला अवॉर्ड परत करणार असल्याची घोषणा तीन दिवसापूर्वी केली होती. मात्र, अद्याप सरकारने कोणतंही ठोस पाऊल उचललं नसल्याने विनेश फोगाटने सन्मान परत करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाच्या दिशेने वाट धरली. त्यावेळी विनेश आणि त्यांच्या साथीदारांना अडवण्यात आल्यानंतर विनेशने आपला अर्जुन पुरस्कार (Arjun Award) कर्तव्याच्या मार्गावर ठेवला आहे.
आठ दिवसापूर्वी बजरंग पुनिया याने आपला पद्मश्री पुरस्कार महिला कुस्तीपट्टूंच्या न्यायासाठी परत केला होता. त्यानंतर आता पुरस्कार परत करण्यापूर्वी विनेश फोगट भावूक झाल्याचं दिसून आलं. हा दिवस कोणत्याही खेळाडूच्या आयुष्यात येऊ नये. देशातील महिला कुस्तीपटू अत्यंत वाईट अवस्थेतून जात आहेत, असं विनेश फोगाटने म्हटलं आहे. मला देण्यात आलेला मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार आणि अर्जुन पुरस्कार परत करत आहेत. या अवस्थेत पोहोचवण्यासाठी खुप खुप आभार, असं विनेश फोगाटने दोन दिवसांपूर्वी मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं.
काय म्हणाली होती विनेश फोगाट ?
जेव्हा 2016 साली जेव्हा साक्षी मलिक ऑलिंपिकमध्ये पदक जिंकून आली होती, तेव्हा तुमच्या सरकारने तिला बेटी बचाओ बेटी पढाओचे ब्रॉड एम्बेसडर केलं होतं. आज जेव्हा साक्षीवर कुस्ती सोडण्याची वेळ आलीये. आम्ही महिला खेळाडू फक्त सरकारच्या जाहिरातींवर प्रसिद्ध होण्यासाठी आहोत का? असा सवाल विनेश फोगाटने विचारला होता.
कुस्तीपटू विनेशला 2016 साली अर्जुन पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर 2020 साली तिला मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार मिळाला होता. त्याचबरोबर आशियाई चॅम्पियनशिपमध्ये एक सुवर्ण आणि एक रौप्य या शिवाय राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 3 सुवर्ण तिने जिंकली आहेत. त्यामुळे आता कुस्तीपट्टूंना अवॉर्ड परत करावा लागत असल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, संजय सिंग यांच्या नेतृत्वाखाली भारतीय कुस्ती महासंघाच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीला क्रीडा मंत्रालयाने निलंबित केलंय. संजय सिंग अध्यक्ष झाल्यानंतर साक्षी मलिक यांनी सर्वप्रथम निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर पुन्हा कुस्तीपट्टूंनी दंड थोपटले होते. तर लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या कार्यकारिणीस आपली बाजू मांडण्याची संधीच देण्यात आली नाही. आम्ही या संदर्भात केंद्र सरकारसह चर्चा करणार आहोत. निलंबन मागे घेतले नाही, तर आम्ही वकिलांसह चर्चा करून न्यायालयात दाद मागणार आहोत, असं संजय सिंह यांनी म्हटलं आहे.