सचिन तेंडुलकर-विनोद कांबळी पुन्हा मैदानात उतरणार
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीची जोडी पुन्हा मैदानात उतरणार आहे.
मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीची जोडी पुन्हा मैदानात उतरणार आहे. मुंबई आणि देशाचे नवे क्रिकेटपटू घडवण्यासाठी या दोघांनी पुढाकार घेतला आहे. सचिन तेंडुलकरची क्रिकेट अॅकेडमी सचिन तेंडुलकर-मिडलसेक्स ग्लोबल अॅकेडमी मुंबईतल्या प्रतिभावान मुलांना क्रिकेटचे धडे देणार आहे. सचिन आणि इंग्लंडची काऊंटी मिडलसेक्स यांच्यामध्ये हा करार झाला आहे. ७ वर्षांच्या मुलांपासून या अॅकेडमीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक प्रशिक्षण देणार आहेत. यामध्ये कांबळीचाही समावेश आहे. या नव्या भूमिकेबद्दल मी उत्साही आहे, अशी प्रतिक्रिया विनोद कांबळीनं दिली आहे.
सचिन तेंडुलकरनं मला हे सांगितल्यानंतर मी लगेचच हो म्हणालो. पुन्हा एकदा मैदानात जाऊन जुने दिवस आठवण्याची संधी मला मिळाली आहे. आचरेकर सरांनी आम्हाला ज्या वयात शिकवलं. त्याच वयाच्या मुलांना मला शिकवायला मिळणार आहे. सचिननं माझ्यावर विश्वास दाखवला, याबद्दल मी त्याचा आभारी आहे, असं वक्तव्य विनोद कांबळीनं केलं आहे. तो मुंबई मिरर या वृत्तपत्राशी बोलत होता.
मी आणि विनोद शाळेत असल्यापासून एकत्र खेळलो. जेव्हा आम्ही काही दिवसांपूर्वी भेटलो तेव्हा या प्रोजेक्टबद्दल मी विनोदला सांगितलं. विनोदनंही लगेचच याला होकार दिला. विनोद कांबळीही आमच्यासोबत आल्यामुळे मी आनंदी आहे, असं सचिन मुंबई मिररला दिलेल्या वृत्तात म्हणाला.
तेंडुलकर-मिडलसेक्स ग्लोबल अॅकेडमी १ नोव्हेंबर ते ४ नोव्हेंबरदरम्यान नेरुळच्या डी.वाय.पाटील स्टेडियममध्ये आणि ६ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबरदरम्यान एमआयजी क्लब वांद्रे येथे कॅम्प भरवणार आहे. निक कॉम्टन, डेव्हिड मलान आणि विनोद कांबळी हे प्रशिक्षक मुंबईतील नवीन प्रतिभावान मुलांचा शोध या कॅम्पमधून घेतील.