Alex Steele Playing Cricket With Oxygen Cylinder : क्रिकेट हा खेळ सर्वच वयोगटातील लोकांना आवडतो आणि केवळ लहान मुले किंवा तरुणच नाही तर वृद्ध देखील हा खेळ पाहण्याचा आणि खेळण्याचा आनंद घेत असतात. क्रिकेटच्या खेळपट्टीवर फलंदाजी, गोलंदाजीसोबतच क्षेत्ररक्षणालाही खूप जास्त महत्त्व असते. तसेच क्षेत्ररक्षकांमध्ये सर्वात कठीण काम म्हणजे यष्टिरक्षकाचे असते. पण एका सामन्यात एका यष्टीरक्षक चक्क पाठीवर ऑक्सिजन सिलेंडर (oxygen cylinder) घेऊन मैदानावर उतरला होता. हे खेळाडू दुसरे तिसरे कोणी नसून  83 वर्षीय स्कॉटिश माजी देशांतर्गत क्रिकेटर अ‍ॅलेक्स स्टील (Alex Steele) होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वयाच्या 83 व्या वर्षी, अ‍ॅलेक्स स्टील हे पाठीवर ऑक्सिजन सिलेंडर घेऊन स्थानिक क्लब सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरले होते. अ‍ॅलेक्स स्टील यांच्या यष्टीरक्षणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याचे खूप कौतुक होत आहे. सर्वजण त्यांच्या क्रिकेटच्या आवडीला सलाम करत आहेत. 2020 मध्ये, अ‍ॅलेक्सला श्वसन रोगाचे निदान झाल्यानंतर स्टील यांना ते जास्तीत जास्त एक वर्ष जगू शकतात असे सांगण्यात आले होते. मात्र तीन वर्षांनंतरही अ‍ॅलेक्स स्टील हे पाठीवर ऑक्सिजन सिलेंडर  मैदानात खेळण्यासाठी आले होते.


सोशल मीडियावर व्हायरल होत असेल्या एका व्हिडीओमध्ये अ‍ॅलेक्स स्टील हे मैदानात यष्टीरक्षण करताना दिसत होते. स्टील सध्या श्वासोच्छवासाच्या आजाराने ग्रस्त आहे ज्यामध्ये शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होते आणि त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. या आजारात नीट श्वास न घेता आल्याने बहुतेकांना जीव गमवावा लागतो. मात्र अशा परिस्थितीतही अ‍ॅलेक्स स्टील हे मैदानात खेळताना दिसत होते.


कोण आहेत अ‍ॅलेक्स स्टील?


फॉरफारशायर क्रिकेट क्लबचे क्रिकेटपटू अ‍ॅलेक्स स्टील यांनी 1967 मध्ये इंग्लंडच्या दौऱ्यावर ओल्ड ट्रॅफर्ड येथे लँकेशायरविरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये स्कॉटलंडकडून पदार्पण केले होते. 1960 च्या उत्तरार्धात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ते स्कॉटिश संघाचे नियमित सदस्य होते. 1969 मध्ये त्यांनी 8 सामनेही खेळले होते. अ‍ॅलेक्स स्टील यांनी 14 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 24.84 च्या सरासरीने 621 धावा केल्या आणि या काळात दोन अर्धशतके झळकावली. 1968 मध्ये आयर्लंडविरुद्धच्या सर्व सामन्यांमध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या 97 होती. तर यष्टिरक्षक म्हणून त्याने 11 झेल घेतले आणि दोन स्टंपिंग केले होते.


 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Cricketgraph (@cricketgraph)


दरम्यान, अ‍ॅलेक्स यांनी एका मुलाखतीत त्यांच्या आजाराबद्दल सांगितले होते. आजाराबाबत आपण फारसा विचार करत नसल्याचे अ‍ॅलेक्स यांनी म्हटलं होतं. कोणत्याही आजारासाठी तुम्ही त्याबद्दल कसा विचार करता किंवा तुमचा दृष्टिकोन काय आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही त्या आजाराशी कसा लढा देता, हे महत्त्वाचे आहे, असे अ‍ॅलेक्स म्हणाले होते.


स्टील यांना ज्या फुफ्फुसाच्या आजाराने ग्रासले आहे, त्यात फुफ्फुसाची क्षमता कालांतराने कमी होत जाते, त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. अ‍ॅलेक्स यांना श्वास घेण्यासही त्रास होत आहे. असे असूनही त्यांची क्रिकेटची क्रेझ कमी झाली नाही आणि त्यासाठी ते मैदानात उतरले होते. मला यापुढेही क्रिकेट खेळायचे आहे, असे त्यांनी म्हटलं आहे.