पाकिस्तान क्रिकेट संघ वर्ल्डकपमधून लाजिरवाण्या पद्धतीने बाहेर पडल्यानंतर त्यांच्यावर टीकेचा भडीमार होत आहे. पाकिस्तानचे माजी खेळाडू रोज यासंबंधी विधान करत असून, नवनवे व्हिडीओही व्हायरल होत असतात. यादरम्यान आता बाबर आझम आणि रिजवान खान यांचा एका व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओत संतापलेला बाबर आझम चक्क मैदानातच बॅट घेऊन मोहम्मद रिजवानच्या मागे धावताना दिसत आहे. यानंतर बाबर आझम इतका का संतापला होता? अशी चर्चा रंगली आहे. 


नेमकं काय झालं होतं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोलंदाजाने चेंडू टाकल्यानंतर बाबर आझम सहकारी फलंदाजाशी चर्चा करण्यासाठी क्रीझ सोडून पुढे आला होता. यावेळी विकेटकिपर मोहम्मद रिजवान चेंडू स्टम्पवर मारतो आणि लेग अम्पायकरकडे रन आऊटसाठी अपील करतो. यानंतर बाबर आझम रिजवानकडे पाहत राहतो. 



काही वेळाने बाबर आझम हातातील बॅटसह मोहम्मद रिजवानच्या मागे धावतो. यानंतर रिजवानही जोरात धावताना दिसत आहे. त्यांच्यातील हे भांडण मजा-मस्तीत सुरु होतं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटकरी तुफान कमेंट्स करत आहेत. दरम्यान त्यांच्या टी-शर्टवर लिहिलं आहे त्यानुसार टीसीएलमध्ये हे सगळं घडलं. 


बाबर आझम कर्णधारपदावरुन पायउतार


वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी न केल्याने टीका होऊ लागल्यानंतर अखेर बाबर आझमने कर्णधारपदाचा राजीनामा दिली आहे. 15 नोव्हेंबरला बाबर आझम कर्णधारपदावरुन पायउतार झाला. वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान संघ 9 पैकी 5 सामने हरल्याने सेमी-फायलनसाठी पात्र ठरु शकला नाही. 


वर्ल्डकपमध्ये कर्णधारपदासह बाबर आझमची वैयक्तिक कामगिरीही अपयशी ठरली. 9 सामन्यात तो फक्त 320 धावा करु शकला. यानंतर त्याच्यावर क्रिकेटतज्ज्ञ आणि चाहत्यांकडून टीकेचा भडीमार झाला. 


दरम्यान बाबर आझमने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर शान मसूदची कसोटीचा नवा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीकडे टी-20 कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, पीसीबीने एकदिवसीय संघाचा नवा कर्णधार कोण असेल हे अद्याप जाहीर केलेलं नाही.


पीसीबीने आपल्या व्यवस्थापनातही फार बदल केले आहेत. वर्ल्डकप स्पर्धा सुरु असतानाच इंझमाम उल हकने राजीनामा दिल्यानंतर माजी वेगवान गोलंदाज वहाब रियाझची मुख्य निवडकर्ता म्हणून निवड करण्यात आली. याशिवाय, पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू मोहम्मद हाफीजची पाकिस्तान पुरुष क्रिकेट संघाचा संघ संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


ऑस्ट्रेलियाविरोधात तीन सामन्यांची कसोटी मालिका


त्याशिवाय, क्रिकेटपटू उमर गुल आणि सईद अजमल यांची पाकिस्तान पुरुष संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करून प्रशिक्षकाच्या भूमिकेतही बदल करण्यात आले आहेत. गुलची वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर अजमल संघाचा फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक असेल.


संघात आणि व्यवस्थापनात इतके बदल केल्यानंतर पाकिस्तान संघ आता ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. 14 डिसेंबरपासून पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियामध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे.