विराट-अजिंक्यचा विक्रम, सचिन-सौरवलाही मागे टाकलं
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे.
एंटिगा : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांच्यात झालेल्या नाबाद शतकी पार्टनरशीपमुळे भारताचा स्कोअर १८५/३ एवढा झाला आहे. तसंच भारताकडे आता २६० रनची आघाडी आहे.
विराट आणि अजिंक्य यांनी त्यांच्या शतकी पार्टनरशीपसोबतच सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीचा विक्रमही मोडित काढला आहे. विराट आणि अजिंक्य यांनी चौथ्या विकेटसाठी भारताकडून सर्वाधिक ८ शतकी पार्टनरशीप केल्या आहेत. याआधी हा विक्रम सचिन आणि सौरवच्या नावावर होता. सचिन आणि सौरव यांनी ७ शतकी पार्टनरशीप केल्या होत्या. तर सचिन आणि अझहरुद्दीन यांनी चौथ्या विकेटसाठी ६ शतकी पार्टनरशीप केल्या.
पहिल्या इनिंगमध्ये ७५ रनची आघाडी मिळाल्यानंतर भारताला दुसऱ्या इनिंगच्या सुरुवातीलाच धक्का लागला. पहिल्या इनिंगमध्ये अपयशी ठरलेल्या मयंक अग्रवालला दुसऱ्या इनिंगमध्येही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. केएल राहुल आणि चेतेश्वर पुजाराही चांगली सुरुवात मिळाल्यानंतर माघारी परतले. पण विराट आणि अजिंक्यने भारताचा डाव सावरला. दिवसाअखेरीस विराट नाबाद ५१ रनवर आणि अजिंक्य नाबाद ५३ रनवर खेळत आहेत.