रांची : इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये भारताचा ४-१नं पराभव झाला आहे. कर्णधार विराट कोहली वगळता इतर भारतीय बॅट्समननी केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळे भारताला पराभव पत्करावा लागला आहे. या सीरिजमधली पहिली मॅच भारतानं ३१ रननं गमवाली तर चौथ्या मॅचमध्ये भारताला ६१ रननं पराभव स्वीकारावा लागला. या दोन्ही मॅचमध्ये भारतीय बॅट्समननं त्यांच्या नावाला साजेसा खेळ केला असता तर या सीरिजचा निकाल वेगळा दिसला असता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडमध्ये झालेल्या या पराभवाचं पोस्टमॉर्टम व्हायला आता सुरुवात झाली आहे. पण सराव सामन्यांवरून धोनी आणि कोहलीची मतं वेगळी असल्याचं दिसत आहे. इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये झालेल्या भारताच्या पराभवावर धोनीनं भाष्य केलं आहे. टेस्ट सीरिजआधी भारतीय टीमनं कमी सराव सामने खेळणं हे पराभवाचं एक कारण असल्याचं धोनी म्हणाला. कमी सराव सामने खेळल्यामुळे भारतीय बॅट्समनना तिथल्या वातावरणाशी जुळवून घेणं कठीण झालं, असं वक्तव्य धोनीनं केलं. हा खेळाचाच भाग आहे. भारतीय टीम पहिल्या क्रमांकावर आहे हे विसरून चालणार नाही, अशी प्रतिक्रिया धोनीनं दिली.


'...तर सराव सामने काय कामाचे?'


एकीकडे धोनीला सराव सामने महत्त्वाचे वाटत असले तरी विराट कोहलीनं मात्र सराव सामन्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. टेस्ट सीरिजआधीच्या सराव सामन्यांसाठी देण्यात येणारी खेळपट्टी आणि विरुद्ध टीमची गुणवत्ताही पाहण्यात यावी असं कोहली म्हणाला होता. अनेक जण सराव सामने खेळवण्यात यावे, असं म्हणतात. पण हे सराव सामने कोणत्या वातावरणात खेळवण्यात येतात आणि अशा सराव सामन्यांमध्ये विरुद्ध टीम कोणत्या गुणवत्तेचे बॉलर घेऊन मैदानात उतरते हे प्रश्न महत्त्वाचे आहेत, असं वक्तव्य विराटनं केलं होतं. 


सराव सामन्यांमध्ये विरुद्ध टीमनं कमजोर खेळाडू मैदानात उतरवले तर त्याचा टेस्ट सीरिजसाठी काहीही फायदा होत नाही. उलट सराव सामने खेळल्यामुळे वेळेचा सदुपयोग होत नाही, असं विराटला वाटतंय.