बंगळुरू : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२०मध्ये टीम इंडियाचा दारुण पराभव झाला. या मॅचनंतर ऋषभ पंत हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या मॅचमध्येही अपयशी ठरल्यामुळे ऋषभ पंतवर टीका होत आहे. ऋषभ पंत १९ रन करुन माघारी परतला. तर दुसरीकडे पंत आणि श्रेयस अय्यरमध्ये झालेला गोंधळ चर्चेचा विषय ठरत आहे. चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार? यावरून दोन्ही खेळाडूंमध्ये गैरसमज झाल्याचं कोहलीने मान्य केलं आहे. शिखर धवनची विकेट गेल्यानंतर पंत आणि अय्यर या दोघांना बॅटिंगसाठी मैदानात उतरायचं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मला वाटतं काहीतरी गैरसमज झाला होता. बॅटिंग प्रशिक्षक विक्रम राठोड यांचं दोघांशी बोलणं झालं होतं. बॅटिंग क्रमवारी लवचिक असल्याचं दोघांना सांगण्यात आलं होतं. तसंच कोणी कोणत्या क्रमांकावर बॅटिंग करायची याची माहितीही देण्यात आली होती. पण धवन आऊट झाला तेव्हा दोघं बॅटिंग करण्यासाठी उभे राहिले. बरं झालं दोघं मैदानात आले नाहीत, नाहीतर मैदानात ३ बॅट्समन हास्यास्पद दिसले असते,' असं विराट म्हणाला.


१० ओव्हरच्या आत दुसरी विकेट गेली तर श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर खेळेल. पण १० ओव्हरनंतर दुसरी विकेट गेली तर पंत चौथ्या क्रमांकावर येईल. विक्रम राठोड यांनीही दोघांना हेच सांगितलं होतं. यानंतर काहीतर गोंधळ झाला, त्यामुळे धवनची विकेट गेल्यानंतर दोघंही बॅटिंगसाठी येत होते, असं कोहलीने स्पष्ट केलं.


शिखर धवन ८व्या ओव्हरला आऊट झाला. त्यामुळे श्रेयस अय्यर बॅटिंगला येणं अपेक्षित होतं. पण तरीही ऋषभ पंत हा चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला आला. गेल्या काही वर्षांपासून टीम इंडियाच्या चौथ्या क्रमांकाच्या बॅट्समनची समस्या संपायचं नाव घेत नाहीये. चौथ्या क्रमांकाच्या बॅट्समनसाठी टीम इंडियाच्या प्रशासनाने आणि निवड समितीने बरेच गोंधळ घातल्याचा आरोपही होत आहे. आता तर चक्क खेळाडूंनीच चौथ्या क्रमांकावरून गोंधळ घातल्याचं दिसत आहे.