`डॉन` बनण्यापासून विराट एक पाऊल लांब
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारताचा शानदार विजय झाला.
मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारताचा शानदार विजय झाला. या मॅचमध्ये विराट कोहलीनं ९७ आणि १०३ रनची खेळी केली. या खेळीमुळे आयसीसीच्या टेस्ट क्रमवारीमध्ये विराट पुन्हा पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. पहिल्या टेस्ट मॅचमध्ये विराटनं १४९ आणि ५१ रन केले होते. त्यामुळे विराट पहिल्या क्रमांकावर गेला. पण लॉर्ड्स टेस्टमध्ये विराट २३ आणि १७ रनवर आऊट झाल्यामुळे विराट दुसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आणि ऑस्ट्रेलियाचा निलंबित खेळाडू स्टीव्ह स्मिथ पहिल्या क्रमांकावर गेला होता. आता नॉटिंगहम टेस्टनंतर विराटनं पुन्हा पहिला क्रमांक काबीज केला आहे.
तिसऱ्या टेस्टमधल्या शानदार कामगिरीमुळे विराटचे टेस्ट क्रिकेटमध्ये ९३७ रेटिंग पॉईंट झाले आहेत. विराटच्या टेस्ट कारकिर्दीतली हे सर्वाधिक रेटिंग पॉईंट आहेत.
टॉप १० पासून विराट १ पॉईंट दूर
सर्वाधिक रेटिंग पॉईंट असणाऱ्या टॉप १० खेळाडूंपासून विराट फक्त १ पॉईंट दूर आहे. या यादीमध्ये डॉन ब्रॅडमन(९६१), स्टीव्ह स्मिथ(९४७), लेन हटन (९४५), जॅक होब्स आणि रिकी पाँटिंग(९४७), पीटर मे (९४१), गॅरी सोबर्स, क्लाईज वालकट, व्हिव्हियन रिचर्ड्स, कुमार संगकारा(९३८) हे खेळाडू आहेत.
विराटनं मोडलं ब्रॅडमनचं रेकॉर्ड
नॉटिंगहम टेस्टमध्ये विराटनं २०० रन केले. विराटनं ७व्यांदा टेस्टमध्ये २०० रन करून टीमला जिंकवून दिलं आहे. सर डॉन ब्रॅडमन आणि रिकी पाँटिंग यांनी ६ वेळा हे रेकॉर्ड केलं होतं. कर्णधार म्हणून विराटनं १० वेळा २०० पेक्षा जास्त रन केले आहेत. कोणत्याही भारतीय कर्णधाराला हा कारनामा करता आलेला नाही.