विराट वनडेतील आतापर्यंतचा सर्वोत्तम बॅट्समन- मायकल क्लार्क
ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मायकल क्लार्कने कोहलीचे तोंड भरुन कौतुक केले आहे.
मेलबर्न : विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय टीमने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ऐतिहासिक विजय मिळवला. तीन टी-२० मॅचची सीरिज १-१नं बरोबरीत सुटल्यानंतर भारताने ऑस्ट्रेलियावर टेस्ट सीरिजमध्ये २-१ ने तर वनडे सीरिजमध्येही २-१ ने पराभव केला. टेस्ट आणि वनडे सीरिजमधला विजय हा भारतासाठी ऐतिहासिक विजय होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्याची यशस्वी सांगता केल्याने भारतीय टीमवर तसंच कर्णधार कोहलीवर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना, यात आणखी एका कौतुकाची भर पडली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मायकल क्लार्कने कोहलीचे तोंड भरुन कौतुक केले आहे.
कौतुक करताना क्लार्क म्हणाला की, विराट हा आतापर्यंतचा सर्वोत्तम बॅट्समन आहे. तसेच कोहली हा वनडे तसचे टेस्टमधील नंबर १ चा बॅट्समन आहे. कोहलीने भारतीय टीमसाठी जे काही प्राप्त केलंय किंवा मिळवून दिलंय, ते पाहता मला या बद्दल तिळमात्र शंका नाही.
'विराट' कामगिरी
विराट ने आतापर्यंत एकदिवसीय काररकिर्दीतील २१९ मॅचमध्ये १० हजार ३८५ रन केल्या आहेत. ज्यात ३९ शतकांचा समावेश आहे. तर त्याची सरासरी ही ५९ पेक्षा अधिक आहे. क्लार्क म्हणाला की, त्याच्या वयोमानानुसार त्याच्या उत्साहाची दाद द्यायला हवी. कोहलीच्या, आपल्या देशाला विजय मिळवून देण्याच्या उत्साहाबद्दल तोड नाही, यासाठी त्याचा सन्मान करायला हवा'. कोहलीत आक्रमकता ही अंगभूत आहे पण त्याच्या खेळाबद्दल कोणीही शंका उपस्थित करु शकत नाही. विराट वनडेमध्ये सर्वश्रेष्ठ असल्याचे क्लार्कने सांगितले.
धोनीबद्दल काय म्हणाला क्लार्क
कोहली एके ठिकाणी विक्रम करत असताना, दुसऱ्या ठिकाणी मात्र धोनीच्या खेळाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. यावर क्लार्क म्हणाला की, धोनीला कोणत्या परिस्थितीत कसे खेळायचे याची पूर्णत: जाणीव आहे. धोनीने ३०० पेक्षा अधिक सामने खेळले आहेत. त्यामुळे टीममध्ये आपली भूमिका काय आहे, या बद्दलची पूर्णत:हा जाणीव धोनीला आहे. असे क्लार्क म्हणाला.
धोनी कितव्याही क्रमांकावर खेळू शकतो
ऑस्ट्रेलिया दौरा सुरु असताना धोनीने कोणत्या क्रमांकावर फलंदाजीसाठी यावे याबद्दल वावड्या उठल्या होत्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात विजयासाठी २३० रनचं आव्हान होतं. जर तेच आव्हान ३३० रनचे असते तर निश्चितपणे धोनी वेगळ्या प्रकारे खेळला असता. धोनी २३० रननुसार खेळत होता. जर विजयी धावसंख्या जास्त असती तर धोनीने नक्कीच आक्रमक खेळ केला असता'.
आगामी वर्ल्ड कपमध्ये धोनीने कोणत्या क्रमांकावर फलंदाजीसाठी यावे, याबद्दल प्रश्न केला असता क्लार्क म्हणाला की, चौथ्या, पाचव्या किंवा सहाव्या अशा कोणत्याही क्रमांकावर धोनी खेळू शकतो. धोनी कोणत्याही क्रमांकावर येऊन बॅटिंग करण्यासाठी परिपूर्ण आहे. तसेच विराट सामन्यादरम्यान असलेल्या परिस्थितीनुसार धोनीला फलंदाजीला पाठवेल, असं क्लार्कला वाटतं.
वर्ल्ड कपमध्ये पांड्याची भूमिका महत्वाची
कॉफी विथ करण या कार्यक्रमात महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे त्याला चौकशी होईपर्यंच निलंबीत करण्यात आले आहे. हार्दिक पांड्या बद्दल मायकल क्लार्क म्हणाला की, पांड्या सारखा अष्टपैलू खेळाडू टीममध्ये असणे ही जमेची बाजू आहे. पांड्या टीमला आपल्या आक्रमक बॅटिंगनं विजय मिळवून देऊ शकतो, तसेच तो वर्ल्ड कपसाठीच्या टीममध्ये असेल, असा विश्वास क्लार्कने व्यक्त केला.