हैदराबाद : विराट कोहलीच्या वादळी खेळीमुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-२०मध्ये भारताचा विजय झाला आहे. कर्णधार विराट कोहलीने या मॅचमध्ये नाबाद ९४ रनची खेळी केली. वेस्ट इंडिजने ठेवलेल्या २०८ रनचा पाठलाग टीम इंडियाने ८ बॉल शिल्लक असतानाच केला. पण या मॅचमध्ये विराटने वेस्ट इंडिजचा फास्ट बॉलर विलियम्सचा २ वर्षांपूर्वीचा हिशोब चुकता केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट आणि विलियम्स यांच्यात या मॅचमध्ये वादही पाहायला मिळाले. १३व्या ओव्हरमध्ये केसरिक विलियम्स आणि विराटने खेळपट्टीवर एकमेकांना जवळपास टक्करच दिली. बॉल अडवायला जात असताना एक रन साठी धावत असलेल्या विराटच्या मध्ये विलियम्स आला. यानंतर कोहलीने लगेच अंपायरकडे तक्रार केली. विलियम्सनेही याप्रकारानंतर माफी मागितली.


२०१७ साली जमैकामध्ये विलियम्सने विराटची विकेट घेतली होती. ही विकेट घेतल्यानंतर विलियम्सने वहीमध्ये लिहायची नक्कल करत सेलिब्रेशन केलं होतं. विराटने १६व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलला फोर आणि तिसऱ्या बॉलला सिक्स मारली. यानंतर विराटनेही विलियम्सच्या पद्धतीनेच वहीमध्ये लिहायची नक्कल करुन हिशोब चुकता केला.



२९ वर्षांचा फास्ट बॉलर विलियम्सच्या नावावर नकोशा रेकॉर्डचीही नोंद झाली. टी-२० क्रिकेटमधला विलियम्स हा वेस्ट इंडिजचा सगळ्यात महागडा बॉलर बनला आहे. विलियम्सने ३.४ ओव्हरमध्ये ६० रन दिले. विलियम्सला या मॅचमध्ये एकही विकेट घेता आली नाही.


टी-२० क्रिकेटमधले वेस्ट इंडिजचे महागडे बॉलर


केसरिक विलियम्स- ६० रन- भारताविरुद्ध (हैदराबाद, ६ डिसेंबर २०१९)


निकिता मिलर- ५६ रन- ऑस्ट्रेलियाविरुद्ध (सिडनी, २३ फेब्रुवारी २०१०)


कार्लोस ब्रॅथवेट- ५६ रन- भारताविरुद्ध(लखनऊ, ६ नोव्हेंबर २०१८)


ओशेन थॉमस- ५६ रन- बांगलादेशविरुद्ध (मीरपूर, २२ डिसेंबर २०१८)