बापरे! वर्ल्डकपआधीच गंभीरने हे काय पोस्ट केलं; विराटचे चाहते संतापून म्हणाले, `हा घाणेरडा माणूस`
Virat Kohli Fans Slams Gautam Gambhir: भारताच्या माजी सलामीवीरावर विराट कोहलीचे चाहते तुटून पडले आहेत. गंभीरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या एका फोटोमुळे हा संताप व्यक्त केला जातोय.
Virat Kohli Fans Slams Gautam Gambhir: भारतात सुरु होत असलेल्या एकदिवसीय क्रिकेटच्या वर्ल्डकप स्पर्धेला अवघे 11 दिवस शिल्लक आहेत. 5 ऑक्टोबरपासून एकदिवसीय क्रिकेटची वर्ल्डकप स्पर्धा भारतात खेळवली जाणार आहे. ही स्पर्धा 19 नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार असून या स्पर्धेसाठी सर्वच देशांनी आपल्या संघांची घोषणा केली आहे. या स्पर्धेसंदर्भात वेगवेगळ्या शक्यता आणि प्रतिक्रिया येत असतानाच भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने एका खेळाडूबरोबरचा स्वत:चा फोटो पोस्ट केला असून यावरुन विराट कोहलीच्या चाहत्यांनी गंभीरला चांगलेच फैलावर घेतले आहे. गंभीरने इन्स्टाग्रामवरुन पोस्ट केलेला हा फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हा फोटो चर्चेत असण्यामागील कारण म्हणजे गंभीर ज्या व्यक्तीबरोबर उभा आहे ती व्यक्ती विराट कोहलीचा कट्टर शत्रू म्हणून क्रिकेट चाहत्यांमध्ये कुप्रसिद्ध आहे.
कोणासाठी गंभीरने केलीय पोस्ट?
गौतम गंभीरने अफगाणिस्तानी क्रिकेटपटू नवीन-उल-हकसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. नुकताच नवीन-उल-हकने 24 व्या वर्षामध्ये पदार्पण केलं. नवीन-उल-हकचा जन्म 23 सप्टेंबर 1999 चा आहे. त्याने शनिवारी आपला 24 वा वाढदिवस साजरा केला. उजव्या हाताने वेगवान गोलंदाजी करणाऱ्या या खेळाडूला अनेकांनी सोशल मीडियावरुन शुभेच्छा दिल्या. लखनऊ सुपर जायंट्स या इंडियन प्रिमिअर लीगमधील संघाचा मार्गदर्शक असलेल्या गौतम गंभीरनेही नवीन-उल-हकबरोबरचा फोटो पोस्ट करत इन्स्टाग्रामवरुन त्याला शुभेच्छा दिल्या.
गंभीरने पोस्टमध्ये म्हटलंय काय?
"नवीन-उल-हक तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुझ्यासारखे फार कमी लोक असतात जे कधीच बदलत नाहीत," अशी कॅप्शन गंभीरने या फोटोला दिली आहे.
चाहत्यांकडून गंभीरवर टीका
मात्र गंभीरने या पोस्टमध्ये जे शब्द वापरले आहेत त्यावरुन चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली असून या वाढदिवसाच्या शुभेच्छांपेक्षा विराट कोहलीला लगावलेला टोला अधिक वाटत असल्याचं म्हटलं आहे. काहींना हा विराटचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं आहे. तर गंभीरच्या या पोस्टवर कमेंट करुन अनेकांनी विराटबद्दल आमच्या मनातील मान वाढल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी हे करायची काही गरज होती का असं गंभीरला विचारलं आहे. एकाने तर गंभीर तू खेळाडू म्हणून उत्तम आहेस पण माणूस म्हणून फार घाणेरडा आहेस असं म्हटलं आहे. तुम्हीच पाहा या पोस्ट खालील चाहत्यांच्या काही निवडक कमेंट्स...
दोघांमधील नेमका वाद काय?
नवीन-उल-हक हा तोच खेळाडू आहे ज्याच्यामुळे विराट कोहली आणि गौतम गंभीरदरम्यान यंदाच्या म्हणजेच 2023 च्या एका सामन्यानंतर मैदानात वाद झाला होता. विराट कोहली आणि नवीन-उल-हकदरम्यान आयपीएल 2023 च्या 43 व्या सामन्यात मैदानात झालेला मोठा वाद चांगलाच चर्चेत आला होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि लखनऊच्या सामन्यादरम्यान नवीन-उल-हक आणि विराट कोहलीमध्ये हा वाद झाला होता. मैदानातच या दोघांची बाचाबाची झाली होती. इतकेच नाही तर सामना संपल्यानंतर हस्तांदोलन करताना विराट कोहलीचा हात नवीन-उल-हकने झटकला. यावरुन विराटने नीवन-उल-हकला तिथेच झापलं. नंतर या वादात गौतम गंभीरने नवीन-उल-हकची बाजू घेत विराटशी वाद घातला. बरं हा वाद केवळ मैदानापुरता राहिला नाही तर सोशल मीडियावरही त्याचे पडसाद उमटले. यावरुनच विराटच्या चाहत्यांनी त्यावेळीही गंभीरला विराटचं यश खुपत असल्याचा आरोप केला होता.
अनेकदा सोशल मीडियावरुन त्याने विराटला केलं ट्रोल
नवीन-उल-हक यानंतर संपूर्ण स्पर्धेदरम्यान खोचक पोस्टच्या माध्यमातून विराट कोहली आणि बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सविरुद्ध टीप्पण्या करत राहिला. कधी आरसीबी पराभूत झाल्यानंतर आंबे गोड असल्याची इन्स्टाग्राम स्टोरी तर कधी आरबीसी पराभूत झाल्यानंतर हसणारे मिम्स नवीन-उल-हकने शेअर केले होते. याच नवीन-उल-हकला आधी संघातून वगळून आता पुन्हा संघात संधी देण्यात आलेली नाही. नवीन-उल-हकने अफगाणिस्तानसाठी 7 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर 14 विकेट्स आहेत.
2 वर्षांनी तो देशाच्या संघातून खेळणार
दरम्यान, नवीन-उल-हकला तब्बल 2 वर्षांनी अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळालं असून तो यंदाचा वर्ल्डकप खेळणार आहे. अफगाणिस्तानने 15 खेळाडूंचा संघ जाहीर करताना हशमतुल्लाह शाहिदीकडे कर्णधारपद सोपवलं या 15 खेळाडूंमध्ये नवीन-उल-हकचा समावेश आहे.
कधी आणि कुठे सामना?
भारत आणि अफगाणिस्तानचा संघ 11 ऑक्टोबर रोजी विश्वचषक स्पर्धेमध्ये एकमेकांशी भिडणार आहेत. नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. या सामन्यात अनेकांच्या नजरा नवीन-उल-हक आणि विराट कोहलीवर असतील हे निश्चित.