नवी दिल्ली – भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये जरी तणावाचं वातावरण असलं तरी क्रिकेटच्या मैदानात दोन्ही देशातील प्लेयर्स हे एक खेळ म्हणूनच खेळत असतात. इतकेच नाही तर एकमेकांचं कौतुक आणि मदतही केल्याचं समोर आलं आहे. आता टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली याने पाकिस्तानी क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन शाहिद आफ्रिदी याच्या फाऊंडेशनला खास भेट दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीने शाहिद आफ्रिदीच्या ‘शाहिद आफ्रिदी फाऊंडेशन’ला खास भेट दिली आहे. विराटने आपली सही असलेली बॅट शाहिद आफ्रिदीच्या फाऊंडेशनला भेट दिली आहे. कोहलीने दिलेल्या या खास भेटीनंतर शाहिद आफ्रिदीनेही विराटचे आभार मानले आहेत.


पाकिस्तान क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन शाहिद आफ्रिदी हा ‘शाहिद आफ्रिदी फाऊंडेशन’ नावाची समाजसेवी संस्था चालवतो. याच समाजसेवी संस्थेला विराट कोहलीने आपली सही असलेली बॅट भेट म्हणून दिली आहे. यानंतर शाहिद आफ्रिदीने ट्विट करत म्हटले आहे की, विराट, एसए फाऊंडेशनला पाठिंबा देण्यासाठी तुझे आभार.



यापूर्वीही शाहिद आफ्रिदीने ज्यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती त्यावेळी टीम इंडियाने त्याला विराट कोहलीचं शर्ट भेट दिलं होतं आणि त्याच्यावर टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंच्या सह्या होत्या. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट मॅच म्हटलं तर फक्त या दोन्ही देशातील क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता नसते तर संपूर्ण जगभरातील क्रीडाप्रेमी ही मॅच पाहण्यासाठी खास प्लॅनिंग करत असतात. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली याने शाहिद आफ्रिदीच्या फाऊंडेशनला केलेली ही मदत म्हणजे दोन्ही देशांच्या सीमा पार करत केलेलं एक कार्य आहे.