Asia Cup 2023 : कोहलीला बळीचा बकरा बनवू नका, `या` माजी खेळाडूने थेट रवी शास्त्रींना सुनावलं!
Sanjay Manjrekar On Ravi Shastri: टीम इंडियाला चौथ्या क्रमांकाची गरज आहे. तर विराटने ती जबाबदारी सांभाळावी, असंही रवी शास्त्रींना वाटतंय. त्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. त्यावर आता संजय मांजरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Virat Kohli at No. 4 batting Position : आगामी आशिया चषकासाठी (Asia Cup 2023) टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने जाहीर केलेल्या यादीत 17 जणांना स्थान देण्यात आलंय. त्यामुळे आता आगामी वर्ल्ड कपसाठी देखील हाच संघ असेल, यावर आता शिक्कामोर्तंब होताना दिसत आहे. अशातच आता टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरतीये ती क्रमांक 4 ची जागा. याच जागेसाठी टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एक सल्ला दिला होता. त्यावर आता टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू संजर मांजरेकर यांनी रवी शास्त्री यांना सुनावलं आहे. त्यावेळी त्यांनी सचिनचं उदाहरण देखील दिलं.
रवी शास्त्री काय म्हणाले होते?
वनडे वर्ल्डकप 2019 मध्ये सिलेक्टर्सशी मी अनेकदा चर्चा केली होती. टीम इंडियाचा मधल्या फळीतील फलंदाज विराट कोहलीने चार नंबरवर फलंदाजी करावी आणि मध्यम क्रमवारीची गुंतागुंत सोडवावी, असं मला वाटत होतं, असं वक्तव्य रवी शास्त्री यांनी केलं होतं. आता टीम इंडियाला चौथ्या क्रमांकाची गरज आहे. तर विराटने ती जबाबदारी सांभाळावी, असंही रवी शास्त्रींना वाटतंय. त्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. त्यावर आता संजय मांजरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय मांजरेकर म्हणतात...
विराटच्या फलंदाजीच्या क्रमात अजिबात गोंधळ होऊ नये. ईशान किशनला बॅटिंग ऑर्डरमध्ये बसवण्याची चर्चा जितकी जास्त होईल. तितकी विराट कोहलीला बॅटिंग ऑर्डर बदलण्याची भीती वाटेल.. जणू तो बळीचा बकरा बनला आहे. असं होऊ देऊ नका, असं मांजरेकर म्हणतात. त्यावेळी त्याने 2007 च्या वर्ल्ड कपची आठवण करून दिली. सचिन तेंडुलकरला चौथ्या क्रमांकावर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि तो सपशेल अपयशी ठरला होता, असं मांजरेकर म्हणतात. त्या वर्ल्ड कपवेळी टीम इंडियाही पहिल्या फेरीतून बाहेर पडली होती, असंही मांजरेकर सांगतात.
कोहली चौथ्या क्रमांकावर कसा खेळलाय?
एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराटने चौथ्या स्थानावर 39 सामन्यांमध्ये 55 पेक्षा जास्त सरासरीने 1767 धावा केल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर उतरताना विराट कोहलीने 7 वनडे शतके ठोकली आहेत. त्याच्या बॅटमधून 8 अर्धशतकेही झळकली आहेत. तर तिसऱ्या स्थानावर विराटने 210 सामन्यांमध्ये 60.20 च्या सरासरीने 10777 धावा केल्या आहेत. त्यामुळे आता विराट कोणत्या पोझिशनवर खेळणार? यावर कॅप्टनला निर्णय घ्यावा लागेल.