पत्रकाराच्या `त्या` प्रश्नावर विराट कोहली संतापला
हा प्रश्न ऐकल्यानंतर विराट कोहली चांगलाच वैतागला.
ख्राईस्टचर्च: न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत २-० असा लाजिरवाणा पराभव झाल्यामुळे भारतीय संघाच्या कामगिरीवर टीका होत आहे. या सामन्यानंतर झालेल्या पत्रकारपरिषदेतही पत्रकारांनी यावरून टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीवर प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी एका पत्रकाराच्या प्रश्नावर विराट कोहली चांगलाच संतापला.
ख्राईस्टचर्च कसोटीच्या पहिल्या डावात केन विल्यम्सन आणि टॉम लॅथम बाद झाल्यानंतर विराट कोहलीने प्रेक्षकांच्या दिशेने हातवारे केले होते. हाच धागा पकडत एका पत्रकाराने मैदानात असताना तू आक्रमकपणाला मुरड घालायला हवीस, असे वाटत नाही का, असा प्रश्न विराटला विचारला. हा प्रश्न ऐकल्यानंतर विराट कोहली चांगलाच वैतागला. यानंतर विराटने म्हटले की, तुम्हाला काय वाटतं? याचे उत्तर तुम्हीच द्या. त्यावेळी नेमके काय घडले होते, याची माहिती घेऊन पुढच्यावेळी एखादा चांगला प्रश्न विचारा. या प्रकारासंदर्भात मी सामनाधिकाऱ्यांशी बोललो आहे. त्यामुळे तुम्ही याठिकाणी अर्धवट माहिती घेऊन येता कामा नये, असे विराटने संबंधित पत्रकाराला सुनावले.
न्यूझीलंडकडून भारताला व्हाईटवॉश; दुसऱ्या कसोटीतही दारूण पराभव
न्यूझीलंड दौऱ्यात विराट कोहली फारशी चमक दाखवू शकलेला नाही. संपूर्ण दौऱ्यात विराटला केवळ एकदाच ५० पेक्षा अधिक धावा करता आल्या आहेत. तर कसोटी मालिकेत विराट २० धावांचीही वेसही ओलांडू शकलेला नाही. त्यामुळे कसोटी क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या भारतीय संघाला न्यूझीलंडकडून २-० असा लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला होता.