दुसऱ्या टेस्टमध्ये विराट इंझमामच्या रेकॉर्डची बरोबरी करणार?
भारत आणि वेस्ट इंडिजमधल्या दुसऱ्या टेस्ट मॅचला शुक्रवारपासून हैदराबादमध्ये सुरुवात होणार आहे.
हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिजमधल्या दुसऱ्या टेस्ट मॅचला शुक्रवारपासून हैदराबादमध्ये सुरुवात होणार आहे. या टेस्टमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीला पाकिस्तानच्या इंझमाम उल हकच्या रेकॉर्डशी बरोबरी करण्याची संधी आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या नावावर २४ शतकं आहे. तर इंझमामनं टेस्ट क्रिकेटमध्ये २५ शतकं केली आहे. २९ वर्षांच्या विराट कोहलीनं ७२ टेस्ट मॅचमध्ये ५४.६६ च्या सरासरीनं ६,२८६ रन केले आहेत.
इंझमामनं १२० टेस्ट मॅचमध्ये ४९.६० च्या सरासरीनं ८,८३० रन केले होते. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये विराट कोहली २१व्या क्रमांकावर आहे. या यादीमध्ये सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये सचिननं ५१ शतकं केली आहेत. सचिननं २०० टेस्टमध्ये ५३.७८ च्या सरासरीनं १५,९२१ रन केले.
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं लगावणाऱ्या बॅट्समनच्या यादीत विराट दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराटच्या नावावर वनडेमध्ये ३५ शतकं आहेत. या यादीमध्येही सचिनच पहिल्या क्रमांकावर आहे. सचिननं वनडे क्रिकेटमध्ये ४९ शतकं केली. कोहलीनं २११ वनडेमध्ये ५८.२० च्या सरासरीनं ९,७७९ रन केले आहेत.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या २ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये भारत १-०नं आघाडीवर आहे. राजकोटमध्ये झालेली पहिली टेस्ट भारतानं इनिंग आणि २७२ रननं जिंकली होती. कोहलीबरोबरच आपली पहिलीच मॅच खेळणारा पृथ्वी शॉ आणि रवींद्र जडेजानं शतक केलं.