लंडन : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारताचा दणदणीत विजय झाला. विराट कोहली हा भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. यानंतर आता चौथ्या टेस्टमध्ये विराट कोहली नव्या लूकमध्ये दिसणार आहे. विराट कोहलीनं ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. यामध्ये विराट प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट आलिम हकीमसोबत दिसत आहे. याआधी आयपीएल २०१८ आधी विराटनं आलिम हकीमकडूनच हेअर स्टाईल बदलली होती. आलिम हकीम सेलिब्रिटींचा हेअर स्टायलिस्ट आहे.


विराटच्या अंगावर ९ टॅटू


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीच्या अंगावर एकूण ९ टॅटू आहेत. विराटच्या डाव्या तळहात्याच्या वर मोनेस्ट्रीचा टॅटू आहे, जो शांती आणि शक्तीचं प्रतीक आहे. या टॅटूच्या मागे कैलास पर्वत आणि मानसरोवर तलावासोबत ध्यान करत असलेल्या शंकराचा टॅटू आहे.


विराटच्या डाव्या हातावर तीन टॅटू आहेत. यातला पहिला टॅटू जपानी समुराई योद्ध्याचा आहे. तर आणखी एका टॅटूवर विराटच्या आई-वडिलांचं नाव हिंदीमध्ये आहे. याचबरोबर विराटनं त्याचा टेस्ट आणि वनडेच्या टोपीचा क्रमांक असलेला टॅटूही बनवून घेतला आहे. विराट कोहलीच्या डाव्या हाताच्या खांद्यावर देवाच्या डोळ्याचा टॅटू आहे. या टॅटूच्या मागे ओम (ॐ) लिहीलेला टॅटू आहे.


विराटनं त्याच्या उजव्या हातावरही काही टॅटू बनवले आहेत. उजव्या हातावर विराटनं त्याची रास असेलला वृश्चिकचा टॅटू गोंदवून घेतलाय. याचसोबत उजव्या हातावर एक चायनीज सिम्बॉलही आहे. हा टॅटू विश्वासाचं प्रतीक आहे.