नवी दिल्ली : श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी भारतानं ४ विकेट्स गमावून ३७१ रन्स केल्या. दिवसाचा खेळ संपला तेव्हा विराट कोहली १५६ रन्सवर नाबाद खेळत आहे. टेस्ट क्रिकेटमधलं विराटचं हे २०वं शतक आहे. आणखी एक द्विशतक झळकावण्यापासून विराट कोहली फक्त ४४ रन्स दूर आहे.


द्विशतक केलं तर कोहलीचा विश्वविक्रम


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीनं द्विशतक झळकावलं तर टेस्ट क्रिकेटमधलं हे त्याचं सहावं द्विशतक असेल. मागच्याच टेस्टमध्ये द्विशतक मारल्यानंतर कोहलीनं सर्वाधिक द्विशतकं लगावणाऱ्या कॅप्टनच्या रेकॉर्डशी बरोबरी केली होती. कॅप्टन म्हणून विराटनं ५ द्विशतकं केली आहेत तर लाराचीही एवढीच द्विशतकं आहेत. कॅप्टन असताना ब्रॅडमन, मायकल क्लार्क आणि ग्रॅम स्मिथ यांनी ४ द्विशतकं झळकावली होती.


गांगुलीच्या रेकॉर्डशीही बरोबरी होणार


श्रीलंकेविरुद्धची ही टेस्ट भारत जिंकला तर कोहली भारताकडून सर्वाधिक टेस्ट जिंकणरा दुसरा कॅप्टन गांगुलीच्या रेकॉर्डशीही बरोबरी करेल. गांगुलीनं ४९ टेस्टमध्ये भारताचं नेतृत्व केलं यापैकी २१ मॅचमध्ये भारताचा विजय झाला. कोहलीच्या नेतृत्वात भारतानं ३१ पैकी २० मॅच जिंकल्या आहेत. धोनी हा भारताचा सर्वाधिक टेस्ट जिंकणारा कॅप्टन आहे. धोनीच्या नेतृत्वात भारतानं २७ टेस्ट जिंकल्या होत्या.


सर्वाधिक टेस्ट जिंकणाऱ्या जगभरातील कॅप्टनच्या यादीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅम स्मिथ पहिल्या क्रमांकावर आहे. स्मिथच्या नेतृत्वात आफ्रिकेचे १०४ टेस्टमध्ये ५३ विजय झाले होते. या यादीमध्ये ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉटिंगचा दुसरा नंबर लागतो. पॉटिंगनं ७७ मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाला ४८ विजय मिळवून दिले.