RCB vs PBKS : स्ट्राईक रेटवरून डिवचणाऱ्या सुनील गावस्करांना विराट कोहलीने काढले चिमटे, म्हणाला...
Virat Kohli pinched Sunil Gavaskar : जर तुमचा स्टाईक रेट हा 118 असेल आणि तुम्ही जर 14 व्या ओव्हरपर्यंत खेळत असाल तर हे सध्याच्या टी-ट्वेंटी क्रिकेटच्या दृष्टीने चुकीचं आहे, असं म्हणत गावस्करांनी विराट कोहलीची शाळा घेतली होती.
Punjab Kings vs Royal Challengers Bengaluru : इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या 58 व्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (PBKS vs RCB) यांच्या जोरदार टक्कर झाली. या सामन्यात आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat kohli) याने धमाकेदार खेळी केली अन् टीकाकारांचं तोंड बंद केलं. टीम इंडियाचे माजी फलंदाज सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी विराट कोहलीला त्याच्या स्टाईक रेटवरून डिवचलं होतं. मात्र, विराट कोहलीच्या बॅटने धावांचा पाऊस पाडला आणि त्याने 47 चेंडूत 92 धावांची स्फोटक खेळी खेळली. विराटने 7 चौकार आणि 6 सिक्सच्या मदतीने 195.74 च्या स्ट्राईक रेटने धावा कुटल्या. त्यानंतर बोलताना विराटने सुनील गावस्करांना चिमटे काढले.
इनिंग्ज ब्रेकमध्ये जेव्हा विराट बोलायला आला तेव्हा, विराटला त्याच्या अफलातून खेळीवर प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी बोलताना विराटने स्ट्राईक रेटचा विजय काढला अन् गावस्करांना कोपरखळी मारली. इनिंगमध्ये माझा स्ट्राइक-रेट कायम राखणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं, असं म्हणत विराटला हसला. त्यामुळे विराटने गावस्करांना टोला लगावलाय, याची जाणीव झाली. मला धावांना वेग घ्यायचा होता पण रजत बाद झाला तेव्हा तो अवघड टप्पा होता. तीन विकेट्स गेल्या अन् पाऊस आला. त्यामुळे मला सेट होण्यासाठी वेळ लागणार होता. मात्र, कॅमेरून ग्रीन आणि मी सेटल झाल्यानंतर पुन्हा आक्रमक खेळलो, असं विराटने यावेळी म्हटलं आहे.
विराट कोहलीने यंदाच्या हंगामात 600 धावांचा टप्पा पार केलाय. त्यामुळे विराट कोहली हा एकूण 4 वेळा हंगामात 600 पेक्षा अधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला. विराट कोहलीने केएल राहुलच्या विक्रमाची बरोबरी केली. तसेच विराटने यंदाच्या हंगामात 30 षटकारांचा आकडा देखील पूर्ण केलाय. तर विराट कोहलीने टी-ट्वेंटी करियरमधील 400 सिक्सचा आकडा देखील पूर्ण केला आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, महिपाल लोमरोर, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटीकपर), स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज आणि लॉकी फर्ग्युसन.
पंजाब किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : सॅम करन (कॅप्टन), जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), प्रभसिमरन सिंग, रायली रोसो, शशांक सिंग, लियाम लिव्हिंगस्टोन, आशुतोष शर्मा, हर्षल पटेल, राहुल चहर, अर्शदीप सिंग आणि विद्वत कवेरप्पा.