मुंबई : ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने काहीच दिवसांपूर्वी पाकिस्तानविरुद्धच्या टेस्टमध्ये ३३५ रनची खेळी केली होती. वॉर्नर ब्रायन लाराचा सर्वाधिक रनचा विक्रम मोडण्याच्या जवळ होता, पण ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने इनिंग घोषित केली. वॉर्नरला माझा विक्रम मोडण्याची चांगली संधी चालून आली होती, असं वक्तव्य ब्रायन लाराने केलं आहे. तसंच २ भारतीय खेळाडू माझा सर्वाधिक रनचा विक्रम मोडू शकतात, असा विश्वास लाराने व्यक्त केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्रायन लाराच्या नावावर टेस्ट इनिंगमध्ये ४०० रनचा विक्रम आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या सीरिजमध्ये कॉमेंट्री करण्यासाठी लारा भारतात आला आहे. जो खेळाडू आक्रमकपणे खेळू शकतो, तो माझं रेकॉर्ड मोडेल, असं लाराला वाटतं.


विराट कोहली ज्याप्रकारे बॅटिंग करतोय, ते पाहून त्याच्याकडे माझा विक्रम मोडण्याची क्षमता आहे. रोहित शर्माही एक किंवा दीड दिवसात ४०० रनचा टप्पा गाठू शकतो, असं भाकीत लाराने केलं. काही दिवसांपूर्वीही लाराला हा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा त्याने रोहित शर्मा आणि पृथ्वी शॉ ४०० रनचा टप्पा ओलांडू शकतात, असं सांगितलं होतं. बंदी उठल्यानंतर पृथ्वी शॉ पुन्हा मैदानात आला आहे. रणजी ट्रॉफीच्या मॅचमध्ये शॉने द्विशतक झळकावलं आहे.


ब्रायन लाराने २००४ साली इंग्लंडविरुद्ध नाबाद ४०० रनची विक्रमी खेळी केली होती. ५८२ बॉलच्या या मॅरेथॉन खेळीमध्ये लाराने ४३ फोर आणि ४ सिक्स लगावले होते. सेंट जॉन्समध्ये झालेल्या या मॅचमध्ये विंडिजचा स्कोअर ७५१/५ एवढा झाला होता. इंग्लंडने पहिल्या इनिंगमध्ये २८५ रन आणि दुसऱ्या इनिंगमध्ये ४२२/५ एवढा स्कोअर केल्यामुळे मॅच ड्रॉ झाली.