विशाखापट्टणम : भारत आणि वेस्ट इंडिजमधली दुसरी वनडे टाय झाली आहे. भारतानं ठेवलेल्या ३२२ रनचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजनं ५० ओव्हरमध्ये ७ विकेट गमावून ३२१ रन केले. शाय होपनं १३४ बॉलमध्ये नाबाद १२३ रन केले. पण त्याला वेस्ट इंडिजला ही मॅच जिंकवता आली नाही. पहिल्या मॅचमध्ये शतकी खेळी करणाऱ्या हेटमेयरनं या मॅचमध्ये ६४ बॉलमध्ये ९४ रनची वादळी खेळी केली. भारताकडून कुलदीप यादवनं सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तर मोहम्मद शमी, उमेश यादव आणि युझवेंद्र चहलला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली.


विराटची एक चूक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मॅचमध्ये बॅटिंग करताना विराटनं केलेली एक चूक भारताला चांगलीच महागात पडली. भारताच्या पहिल्या दोन विकेट लवकर गेल्यानंतर विराट आणि अंबाती रायुडूनं डाव सावरायला सुरुवात केली. ११व्या ओव्हरमध्ये नर्सच्या बॉलिंगवर विराटनं डीप मिडविकेटच्या दिशेनं बॉल खेळला आणि तो २ रन धावला. दुसऱ्या रनसाठी विराटनं पहिली रन काढताना क्रिजला बॅटच टेकवली नाही, त्यामुळे अंपायरनं २ऐवजी एकच रन दिली.



विराटनं बॅट टेकवली असती तर भारताचा स्कोअर ३२२ रन झाला असता आणि वेस्ट इंडिजला विजयासाठी ३२३ रनची गरज पडली असती. अशा स्थितीमध्ये भारतानं ही मॅच १ रननं जिंकली असती.


शेवटच्या दोन बॉलवर वेस्ट इंडिजला विजयासाठी ७ रनची आवश्यकता होती. शाय होपनं शेवटून दुसऱ्या बॉलवर २ रन काढल्या आणि शेवटच्या बॉलवर फोर मारून वेस्ट इंडिजला मॅच टाय करून दिली.


या मॅचमध्ये विराटनं रन काढताना चूक केली असली तरी त्यानं वनडे क्रिकेटमधलं त्याचं ३७वं शतक पूर्ण केलं. विराटनं १२९ बॉलमध्ये नाबाद १५७ रनची खेळी केली. यामध्ये १३ फोर आणि ४ सिक्सचा समावेश होता. या सीरिजच्या पहिल्या वनडेमध्येही विराटनं शतक केलं होतं.


विराटनं मोडला सचिनचा विक्रम


विराट कोहलीनं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला आहे. वनडे क्रिकेटमध्ये विराटनं १० हजार रन पूर्ण केले आहेत. वनडे क्रिकेटमध्ये एवढ्या जलद १० हजार रन पूर्ण करणारा विराट पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. विराटनं २०५व्या इनिंगमध्ये हा टप्पा ओलांडला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये विराटला हा टप्पा ओलांडायला ८१ रनची गरज होती. सचिन तेंडुलकरनं हे रेकॉर्ड २५९ इनिंगमध्ये केलं होतं.


वनडेत सर्वाधिक शतकं करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट दुसऱ्या क्रमांकावर आहे. सचिन तेंडुलकर याच्या नावावर वनडेमध्ये सर्वाधिक ४९ शतकांची नोंद आहे. वनडे क्रिकेटमध्ये १० हजार रन पूर्ण करणारा विराट १३वा खेळाडू बनला आहे.


याआधी वनडेमध्ये सचिन तेंडुलकर, कुमार संगकारा, रिकी पाँटिंग, सनथ जयसूर्या, महेला जयवर्धने, इंझमाम उल हक, जॅक कॅलिस, सौरव गांगुली, राहुल द्रविड, ब्रायन लारा, तिलकरत्ने दिलशान आणि एम.एस. धोनी यांनी वनडेमध्ये १० हजार रनचा टप्पा ओलांडला आहे.