Virat Kohli: `विराटला एक कसोटी खेळवा आणि बाहेर काढा`, `या` दिग्गज खेळाडूच्या ट्वीटमुळे खळबळ
ट्वीटमध्ये एका दिग्गज खेळाडूने कोहलीला संघातून बाहेर काढा, असं म्हटलं आहे.
Virat Kohli Test Career: विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये 11 वर्षे पूर्ण केली आहेत. विराटने या 11 वर्षात टीम इंडियासाठी अनेक चांगल्या खेळी खेळल्या आहेत. एक कर्णधार म्हणूनही विराट कोहली यशस्वी ठरला आहे. या दरम्यान सोशल मीडियावर एक ट्वीट प्रचंड व्हायरल होत आहे. या ट्वीटमध्ये एका दिग्गज खेळाडूने कोहलीला संघातून बाहेर काढा, असं म्हटलं आहे.
विराट कोहलीने 2011 साली वेस्ट इंडिजविरुद्ध सबिना पार्कवर कसोटी पदार्पण केले होते. 2012 मध्ये कोहली कठीण टप्प्यातून जात होता. त्यानंतर त्याला वगळण्याची मागणी करण्यात आली. या सगळ्या दरम्यान माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनीही विराटवर प्रश्न उपस्थित केले आहेत. आता मांजरेकर यांचे 10 वर्ष जुने ट्विट व्हायरल होत आहे.
एकच सामना खेळण्याची संधी
त्या काळात राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर आणि गौतम गंभीरसारखे दिग्गज खेळाडू भारतीय कसोटी संघात खेळत होते. संजय मांजरेकर यांनी 6 जानेवारी 2012 रोजी केलेल्या ट्विटमध्ये लिहिले होते की, 'मी अजूनही व्हीव्हीएस लक्ष्मणला वगळून पुढील कसोटीत रोहितला घेईन. दीर्घ योजना पाहता हे योग्य आहे. विराटला आणखी एक कसोटी खेळवा. फक्त विराट कसोटी खेळू शकत नाही याची खात्री करण्यासाठी.'
विराट कोहलीची कसोटी कारकीर्द
विराट कोहलीला 2011 मध्ये पहिल्यांदा पांढऱ्या जर्सीमध्ये खेळण्याची संधी मिळाली. त्याने भारतासाठी आतापर्यंत 101 कसोटी सामने खेळले आहेत. कोहलीने या कसोटी सामन्यांमध्ये 7 द्विशतके, 27 शतके आणि 28 अर्धशतकांच्या मदतीने 8043 धावा केल्या आहेत. विराट हा कसोटी क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे.