मुंबई : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा तब्बल ३१८ रननी दणदणीत विजय झाला. या विजयासोबतच कोहलीने त्याच्या नावावर आणखी एक विक्रम केला आहे. विराटचा कर्णधार म्हणून हा १००वा विजय होता. विजयाचे शतक साजरे करणारा कोहली हा तिसरा भारतीय तर १२ वा आंतरराष्ट्रीय कर्णधार आहे. त्याने २७ टेस्ट, ५८ वन डे आणि १५ टी-२० सामन्यांत कर्णधार म्हणून विजय साजरे केले आहेत. कोहलीनं १५२ आंतरराष्ट्रीय सामन्यांत हा पल्ला सर केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनीने भारताला सर्वाधिक १७८ विजय मिळवून दिले. तर अझहरुद्दीन कर्णधार असताना भारताला १०४ मॅचमध्ये विजय मिळाला. रिकी पाँटिंग हा क्रिकेट जगतातला सगळ्यात यशस्वी कर्णधार आहे. पाँटिंग कर्णधार असताना ऑस्ट्रेलियाने २२० मॅच जिंकल्या. २०० पेक्षा जास्त विजय मिळवणारा पाँटिंग हा एकमेव कर्णधार आहे.


कोहली, धोनी, पाँटिंग, अझहरुद्दीन यांच्याशिवाय न्यूझीलंडचा स्टीफन फ्लेमिंग, दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅम स्मिथ, ऑस्ट्रेलियाचे एलन बॉर्डर, श्रीलंकेचा अर्जुना रणतुंगा, दक्षिण आफ्रिकेचा हॅन्सी क्रोनिये, श्रीलंकेचा महेला जयवर्धने, वेस्ट इंडिजचे क्लाईव्ह लॉईड आणि ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह वॉ यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून १०० आणि त्यापेक्षा अधिक विजय मिळवले.


विराट यशस्वी कर्णधार


परदेशामध्ये सर्वाधिक टेस्ट मॅच जिंकण्याचा विक्रम विराटने केला आहे.  विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताने परदेशात २६ पैकी १२ टेस्ट मॅच जिंकल्या आहेत. तर सौरव गांगुलीच्या नेतृत्वात परदेशात भारताने २८ मॅचपैकी ११ मॅचमध्ये विजय मिळवला होता.


भारताचा सगळ्यात यशस्वी कर्णधार व्हायला आता विराट कोहलीला फक्त एका विजयाची गरज आहे. विराटने धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. धोनी आणि कोहलीच्या नेतृत्वात भारताने प्रत्येकी २७ टेस्ट मॅच जिंकल्या आहेत.


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करणाऱ्या खेळाडूंमध्ये विराट तिसऱ्या क्रमांकावर आहे. सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतकं तर रिकी पाँटिंगने ७१ शतकं केली होती. सचिन आणि पाँटिंगनंतर विराटने ६८ शतकं केली आहेत. विराटची वनडेमध्ये ४३ शतकं आणि टेस्टमध्ये २५ शतकं झाली आहेत.