कोहलीनं १७ दिवसांमध्येच रूटचा बदला घेतला
भारताच्या इंग्लंडविरुद्धच्या ५ टेस्ट मॅचच्या सीरिजला सुरुवात झाली आहे.
बर्मिंगहम : भारताच्या इंग्लंडविरुद्धच्या ५ टेस्ट मॅचच्या सीरिजला सुरुवात झाली आहे. पहिल्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये इंग्लंडचा डाव २८७ रनवर संपुष्टात आला. भारताकडून अश्विननं सर्वाधिक ४ विकेट घेतल्या तर मोहम्मद शमीला ३ विकेट घेण्यात यश आलं. इशांत शर्मा आणि उमेश यादवनं प्रत्येकी १-१ विकेट घेतली. इंग्लंडचा कर्णधार जो रूटनं सर्वाधिक ८० रन केल्या. पण विराट कोहलीनं त्याला रन आऊट केलं. रूटला आऊट केल्यानंतर विराट कोहलीनं माईक ड्रॉप सेलिब्रेशन केलं. आणि १७ दिवसांच्या आतच रुटचा बदला घेतला.
भारताविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये जो रूटनं शतक केलं आणि विराटकडे पाहून आपली बॅट मैदानात टाकत हात वर केला. त्यानंतर आता रुटची विकेट घेतल्यानंतर विराटनंही अशाच प्रकारे हात वर करून सेलिब्रेशन केलं. दरम्यान जो रूटनं वनडेमध्ये केलेलं ते सेलिब्रेशन इंग्लंडच्या वनडे टीमचा कर्णधार इओन मॉर्गनला आवडलेलं नव्हतं. पण इंग्लंडचा फास्ट बॉलर स्टुअर्ट ब्रॉडनं मात्र रुटची बाजू घेतली होती. अॅन्ड्र्यू फ्लिंटॉफनं वानखेडे स्टेडियमवर केलेल्या टी शर्ट काढण्यापेक्षा बॅट मैदानावर टाकणं कधीही चांगलं, असं ट्विट स्टुअर्ट ब्रॉडनं केलं होतं.