`तुम्हा सर्वांसाठी मी एकटाच...`; सेहवागने `घाबरु नको` म्हणणाऱ्या शोएब अख्तरची बोलती केली बंद
घाबरु नको म्हणणाऱ्या पाकिस्तानी गोलंदाजांना विरेंद्र सेहवागने सडेतोड उत्तर देत बोलतीच बंद केली. त्यांच्यातील संभाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग निवृत्त झाला असला तरी मैदानाबाहेरही आपल्या शब्दांनी तुफान फटकेबाजी करत असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो आपल्या स्वभावाची चुणूक नेहमी दाखवत असतो. त्याच्या पोस्ट अनेकदा व्हायरलही होत असात. दरम्यान, नुकताच वीरेंद्र सेहवागचा पाकिस्तानचे दिग्गज गोलंदाज शोएब अख्तर, वसीम अक्रम आणि वकार युनिस यांच्याशी आमना-सामना झाला. यावेळीही वीरेंद्र सेहवागने आपल्या स्वभावाप्रमाणे त्यांना टोला लगावला. त्याचं ते उपहासात्मक बोलणं ऐकून पाकिस्तानी गोलंदाजांनाही हसू आवरत नव्हतं. या व्हिडीओ कॉलमध्ये हरभजन सिंगही होता.
हा व्हिडीओ कॉल वर्ल्डकप टी-20 समालोचनासंबंधी होता. हे सर्व या पॅनलचा भाग आहेत. यानिमित्ताने आयोजित व्हिडीओ कॉलमध्ये पाचही माजी खेळाडू सहभागी झाले होते. यादरम्यान खेळकर पद्धतीने सर्व खेळाडू एकमेकांचा पाय खेचत होते.
पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने यावेळी सर्व गोलंदाज आहेत सांगत सेहवागला घाबरु नकोस असा सल्लादिला. त्यावर सेहवागने आपल्या स्वभावाप्रमाणे टोला लगावत, तुमच्या सर्वांसाठी मी एकटाच पुरेसा आहे असं उत्तर दिलं. यावर उपस्थित सर्वांनाच हसू आवरत नव्हतं.
याआधी सेहवागने इंग्लंड संघाची खिल्ली उडवली होती. भारत दौऱ्यावर येताना इंग्लंड संघ आपला आचारी सोबत घेऊन येणार आहे. आजारी पडण्याच्या भीतीने इंग्लंड संघ स्वत:चा शेफ घेऊन येणार असल्याचं वृत्त टेलिग्राफने दिलं आहे. इंग्लंड हा पहिलाच संघ असणार आहे हो जो यजमानांचा अपमान होण्याची भीती असतानाही आपला शेफ सोबत घेऊन जाणार आहे. 25 जानेवारीपासून इंग्लंड संघाच्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. दोन्ही संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे.
यावर सेहवागने टोला लगावत म्हटलं आहे की, "कूक गेल्यानंतर यांना ही गरज भासली आहे. आयपीएलमध्ये ही गरज लागणार नाही". भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर आकाश चोप्राने यावरुन उपहासात्मक टीका केली आहे. 'चांगली कल्पना आहे. आयपीएलमध्येही प्रत्येक वर्षी इंग्लंडचे अनेक खेळाडू आपले शेफ सोबत घेऊन येतील याची मला खात्री आहे,' असा टोला त्याने लगावला आहे.