व्हिडिओ : विरेंद्र सेहवागने उडवली टीम इंडियाची खिल्ली
दुसऱ्या टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेनं ठेवलेल्या २८७ रन्सचा पाठलाग करताना भारतीय बॅट्समनची दाणादाण उडाली आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर ३५/३ एवढा झाला आहे.
नवी दिल्ली : दुसऱ्या टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेनं ठेवलेल्या २८७ रन्सचा पाठलाग करताना भारतीय बॅट्समनची दाणादाण उडाली आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर ३५/३ एवढा झाला आहे.
टीम इंडियाच्या बॅट्समन्सची पडझड सुरू झाल्याने विजयाच्या आशा धुसर झाल्या आहेत. दरम्यान माजी स्फोटक बॅट्समन विरेंद्र सेहवागने टीम इंडियाची 'फिरकी' घेतली आहे.
व्यंगात्मक ट्विट
टेस्टच्या पाचव्या दिवशी सकाळ सकाळी सेहवागने व्यंगात्मक ट्विट केले. आमीरच्या लगान सिनेमातील एका सीनची GIF फाईल त्याने शेअर केली. यामध्ये आमीर आकाशात बघून पाऊस येण्याची वाट पाहत आहे.
'टीम इंडियाला जर अजून एका लाजिरवाण्या पराभवातून वाचायचे असेल तर त्यांना पाऊस येण्याची प्रार्थना करावी लागेल. ' असे स्पष्टीकरणही सेहवागने दिले आहे.
चौथ्या दिवसाअखेरीस पुजारा ११ रन्सवर तर पार्थिव पटेल ५ रन्सवर खेळत आहे.
दक्षिण आफ्रिकेकडून एनगिडीनं २ तर कागिसो रबाडानं एक विकेट घेतली.
२८७ रन्सचा पाठलाग करायला आलेल्या भारताला ११ रन्सवर पहिला, १६ रन्सवर दुसरा आणि २६ रन्सवर तिसरा धक्का बसला.
मुरली विजय(९), लोकेश राहुल(४) आणि विराट कोहली (५) रन्सवर आऊट झाला.
पहिल्या इनिंगमध्ये २८ रन्सची आघाडी मिळाल्यावर दुसऱ्या इनिंगमध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ २५८ रन्सवर ऑल आऊट झाला. भारताकडून मोहम्मद शमीनं सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या तर बुमराहला ३, इशांत शर्माला २ आणि आर.अश्विनला एक विकेट मिळाली.
दक्षिण आफ्रिकेकडून एबी डिव्हिलियर्सनं सर्वाधिक ८० रन्स बनवल्या तर कॅप्टन फॅप डुप्लेसिसनं ४८ रन्स केल्या.
चौथ्या दिवसाची सुरुवात ९०/२ अशी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला पहिले तीनही धक्के मोहम्मद शमीनं दिले. शमीनं डीन एल्गारला ६१ रन्सवर, एबी डिव्हिलियर्सला ८० रन्सवर आणि क्विंटन डीकॉकला १२ रन्सवर ऑल आऊट केलं.
त्यानंतर डुप्लेसीस आणि फिलँडरमध्ये पुन्हा एकदा पार्टनरशीप झाली. फिलँडरची विकेट काढून इशांत शर्मानं ही पार्टनरशीप तोडली.
इंडियासाठी महत्त्वाची मॅच
केप टाऊनमध्ये झालेल्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा पराभव झाला होता. त्यामुळे ३ टेस्ट मॅचच्या या सीरिजमधील आव्हान कायम ठेवण्यासाठी भारताला ही मॅच जिंकावी लागणार आहे.