मुंबई : भारताची स्टार धावपटू हिमा दास हिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. दरम्यान हिमाचा हा व्हिडीओ दिशाभूल करणारा असून त्यामुळे अनेकांचा गैरसमज झाला. याला माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागही अपवाद ठरला नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये ट्रॅक आणि फील्ड इव्हेंट्स सुरू होण्याच्या तीन दिवस आधी, हिमाच्या या व्हिडिओला 3,000 हून अधिक लाईक्स मिळाले आणि 6,000 हून अधिक वेळा रिट्विट केले गेले.


हिमा दासचा फेक व्हिडीओ व्हायरल


'पिगासस' ट्विटर हँडलवरून पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये दावा करण्यात आला आहे की, हिमा दासने बर्मिंगहॅममधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 400 मीटरमध्ये सुवर्णपदक जिंकलंय. हा व्हिडिओ 2018 मध्ये फिनलंडमधील टॅम्पेरेमध्ये झालेल्या U-20 जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमधील आहे. ज्यावेळी ती चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय बनली होती.



सेहवागही धोक्याचा शिकार


सेहवागही या फेक व्हिडिओचा बळी ठरला आणि त्याने ट्विट केलं की, या स्टार धावपटूने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या 400 मीटर स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं. सेहवागला ही चुकीची माहिती सांगितल्यावर त्याने हे ट्विट डिलीट केलं. 


सेहवागने डिलीट केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, 'किती शानदार विजय! भारतीय खेळाडूंनी चांगली सुरुवात केली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील 400 मीटर स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल हिमा दासचं खूप खूप अभिनंदन.