आली लहर केला कहर! दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूनं टी-२०मध्ये केलं द्विशतक
टी-२० क्रिकेटमध्ये संपूर्ण टीमनं २०० रन केले तर त्याला मोठा स्कोअर समजलं जातं.
मुंबई : टी-२० क्रिकेटमध्ये संपूर्ण टीमनं २०० रन केले तर त्याला मोठा स्कोअर समजलं जातं. पण दक्षिण आफ्रिकेच्या एका क्रिकेटपटूनं २० ओव्हरच्या क्रिकेटमध्ये एकट्यानं २०० रन केले आहेत. फ्रेडरिक बोएर असं या क्रिकेटपटूचं नाव आहे. फ्रेडरिक बोएर हा नेत्रहीन खेळाडू आहे. दक्षिण आफ्रिकेच्या प्रिटोरियामध्ये सध्या नेत्रहिनांची टी-२० स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत बोलंड टीमकडून खेळताना फ्रेडरिकनं ७८ बॉलमध्ये २०५ रन केले. टी-२० क्रिकेटमध्ये २०० रन करणारा फ्रेडरिक बोएर दक्षिण आफ्रिकेचा पहिला खेळाडू ठरला आहे.
फ्रेडरिक बोएरनं २०५ रनपैकी १८० रन फक्त फोर आणि सिक्सच्या मदतीनं केले. फ्रेडरिकच्या खेळीमध्ये एकूण ३९ फोर आणि ४ सिक्सचा समावेश होता. बोएरनं त्याच्या एकूण रनच्या ८७.८० टक्के रन फोर-सिक्स मारून केल्या. यातल्या ७८ रन तर मिड विकेटवर आल्या. फ्रेडरिक बोएर शेवटच्या बॉलवर आऊट झाला. या मॅचमध्ये बोलंडचा दुसरा ओपनर शोफर्ड माग्बानंही चांगली खेळी केली. माग्बानं ५३ बॉलमध्ये ९७ रन केले.