वसीम अक्रमच्या वाढदिवसाचा केक कापल्यानंतर वकार युनूसची माफी
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वकार युनूसला वसीम अक्रमच्या वाढदिवसाचा केक कापल्यामुळे माफी मागावी लागली आहे.
मुंबई : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वकार युनूसला वसीम अक्रमच्या वाढदिवसाचा केक कापल्यामुळे माफी मागावी लागली आहे. केक कापल्यामुळे वकार युनूसवर सोशल मीडियातून टीका झाली होती. पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रम ३ जूनला ५२ वर्षांचा झाला. यादिवशी पाकिस्तानची टीम इंग्लंडविरुद्ध दुसरी टेस्ट मॅच खेळत होती. या मॅचमध्ये वसीम अक्रम, वकार युनूस आणि रमीझ राजा कॉमेंट्री करत होते. कॉमेंट्री करताना वकार युनूसनं वसीमच्या वाढदिवसाचा केक कापला. यानंतर वकारला सोशल नेटवर्किंगवर लक्ष करण्यात आलं. रमजान सुरु असताना केक कापणं चुकींच असल्याची टीका सोशल नेटवर्किंगवर करण्यात आली.
सोशल मीडियावरच्या या टीकेनंतर वकारनं माफी मागितली. आम्हाला रमजान आणि रोजा ठेवणाऱ्यांचा मान राखायला हवा. केक कापल्याबद्दल मी माफी मागतो, असं ट्विट वकार युनूसनं केलं आहे.
स्विंगचा सुलतान म्हणून ओळख असलेल्या वसीम अक्रमचा जन्म ३ जून १९६६ साली पाकिस्तानच्या लाहोरमध्ये झाला. १९ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अक्रमनं १०४ टेस्टमध्ये ४१४ आणि ३५६ वनडेमध्ये ५०२ विकेट घेतल्या.