मुंबई : आयपीएलच्या बाराव्या मोसमाला २३ मार्चपासून सुरुवात होणार आहे. पण आयपीएल सुरु होण्याआधीच मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना त्यांच्या आवडत्या टीमचा मागच्या १२ वर्षांचा संघर्षपूर्ण प्रवास अनुभवता येणार आहे. नेटफ्लिक्सनं 'क्रिकेट फिव्हर- मुंबई इंडियन्स' या वेब सीरिजचा प्रोमो लॉन्च केला आहे. १ मार्चला या वेब सीरिजचा नेटफ्लिक्सवर प्रिमिअर करण्यात येणार आहे. 'क्रिकेट फिव्हर- मुंबई इंडियन्स' ही ८ भागांची वेब सीरिज असेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई इंडियन्सची टीम आत्तापर्यंतच्या ११ आयपीएलपैकी ३ आयपीएल जिंकली. सर्वाधिक आयपीएल जिंकण्याचं रेकॉर्ड सध्या मुंबई आणि धोनीच्या चेन्नईच्या नावावर आहे. मुंबई इंडियन्सनं आत्तापर्यंत २०१३, २०१५ आणि २०१७ सालची आयपीएल जिंकली. मागच्या वर्षीच्या आयपीएलमध्ये मात्र मुंबईची कामगिरी निराशाजनक झाली. मागच्या मोसमामध्ये मुंबईला प्ले ऑफमध्येही पोहोचता आलं नव्हतं.



मुंबई इंडियन्सच्या या वेब सीरिजच्या प्रोमोमध्ये मैदानाबाहेरच्या, ड्रेसिंग रूममधल्या आणि टीमच्या बैठकीमधल्या काही गोष्टी, तसंच टीमचे काही भावूक क्षण दाखवण्यात आल्या आहेत. या प्रोमोमध्ये महेला जयवर्धने, सचिन तेंडुलकर तसंच मालक आकाश आणि निता अंबानीही दाखवण्यात आले आहेत.


'एवढे जणं मला सल्ले देतात. एवढी माणसं येऊन माझ्या कानात बोलतात. मी नक्की कोणाचे सल्ले ऐकू?' असं रोहित शर्मा या वेब सीरिजमध्ये बोलत आहे. तर सचिन तेंडुलकर टीमचा उत्साह वाढवण्यासाठी भाषण करताना दिसत आहे. यामध्ये सचिन २०१५ साली मुंबईनं खराब सुरुवातीनंतरही कसा संघर्ष केला आणि आयपीएलमध्ये कसा विजय मिळवला, हे सांगत आहे. 


आयपीएल वेळापत्रकाची घोषणा, पाहा कधी आहेत मुंबईच्या मॅच